पालकमंत्री सावंतांकडून प्रशासनाची पाठराखण

शहरातील कचरा समस्या सोडविण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळत असल्याचा दावा पालकमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी केला. आजही शहरातील विविध रस्त्यांवर ७४० टन कचरा असल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांत १४ हजार ४६६ टन कचऱ्यांची विल्हेवाट लावल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील काही भागात रस्ता दुभाजकावर कचरा असल्याचे त्यांनी मान्य केले. कचरा जाळण्याच्या अगदी मोजक्याच घटना असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यासही त्यांनी सहमती दर्शविली.

कचऱ्याची समस्या निर्माण झाल्यानंतर रस्त्यावरचा कचरा कोठेही टाकता येईना म्हणूून प्रशासनाने तो पुरला होता. ही विल्हेवाट लावण्याची पद्धत योग्य का, या प्रश्नावर त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. मात्र, जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार संभाळणारे नवल किशोर राम यांनी सध्या कचऱ्यापासून खत निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कचऱ्याची समस्या मिटेल, असा दावा केला. नकारात्मक भूमिका न घेता ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी सर्वानी सहकार्य करण्याची गरज असल्याचे या वेळी सांगण्यात आले. नारेगाव येथील नागरिकांना, कचरा टाकू द्या, अशी विनंती करण्यासाठी पालकमंत्री शहरात आले होते. त्यानंतर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज, सर्वसामान्य व्यक्तींना केलेली नाहक मारहाण या घटनेनंतरही पालकमंत्री शहरात आले नव्हते. कचरा प्रश्न महापालिका सोडविण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यातून शिवसेनेची बदनामी झाली. तरीही पालकमंत्री शहरात आले नव्हते. राज्य सरकारने कचरा प्रश्नावर भूमिका घेत सविस्तर प्रकल्प अहवालास मंजुरी देत ८८  कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे सरकारी यंत्रणा कामाला लागली. त्यांनतर पालकमंत्री दीपक सावंत यांनी कचरा प्रश्नावर शनिवारी भेट घेतली. प्रत्येक वॉर्डात कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे पालकमंत्री सावंत यांना सांगण्यात आले. ७७ ठिकाणी असे प्रयोग सुरू झाल्याचे सांगण्यात आले. प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एकरभर जागेची आवश्यकता आहे. ती मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी या वेळी सांगितले.

औषधाचा तुटवडा नाही

मराठवाडय़ासह राज्यातील आरोग्य केंद्रात तसेच जिल्हा रुग्णालयात औषधाचा तुटवडा नाही, असे सांगत सावंत यांनी एखादे दुसरे प्रतिजैविक उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र औषधांचा मोठा तुटवडा असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात. औषध तुटवडय़ात भाजपच्या आरोग्य शिबिरावर बोलण्याचे त्यांनी टाळले.