भाजपाला सत्तेसाठी कायमचा पाठिंबा देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा शब्द तरी उद्धव यांनी बाळासाहेबांना दिला होता का?, बाळासाहेबांना ते कदापी आवडले नसते. मी पाहिलेले उद्धव ठाकरे असे नव्हते, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. कोल्हापूरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी सुधारित नागरिकत्व कायद्याचे जोरदार समर्थन करून फडणवीसांनी विरोधकांना धारेवर धरले. कायदा न्यायपूर्ण असून त्याने राष्ट्रहित साधले जाणार आहे. यामुळे पोटशूळ उठलेले काही पक्ष अफवा पसरवत आहेत. राजकीय हेतूने प्रेरित होऊन समाजाचे विभाजन करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

आणखी वाचा – अवकाळीग्रस्तांच्या तोंडाला सरकारनं पुसली पानं; न्यायासाठी रस्त्यावर उतरणार – फडणवीस

विदर्भात ठाकरे स्वतः लक्ष घालणार आहेत तर पुणे महापालिकेत ५० जागा मिळवण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे, अशा प्रकारे शिवसेनेने भाजपविरोधी आक्रमक मोहीम उघडली आहे. याकडे लक्ष वेधले असताना फडणवीस यांनी उत्तर देताना म्हटले की, केवळ बोलण्यात आक्रमता नको कृती करून दाखवा.

दरम्यान, ठाकरे सरकारच्या पहिल्याच अधिवेशनावर फडणवीस यांनी हल्ला चढवला. हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. मात्र, हे अधिवेशन म्हणजे फक्त औपचारिकता होती. आम्ही ५ तास प्रश्न उपस्थित केले. मात्र, मंत्र्यांनी फक्त ३ मिनिटे बोलून उत्तरे दिली, असा चिमटा त्यांनी काढला. फडणवीस सरकारच्या योजनांना ठाकरे सरकार स्थगिती देत असल्याच्या मुद्दावर फडणवीस म्हणाले, चांगल्या योजनांचे श्रेय घ्यायचे आणि अयोग्य वाटत असेल तर बाजूला जायचे असे सोयीची भुमिका ठाकरे घेत आहेत.