लोकसभा निवडणुकीतील नगर मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पराभवाबद्दल पालकमंत्री मधुकर पिचड, जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार व पराभूत उमेदवार राजीव राजळे यांनी आपापले स्वतंत्र अहवाल पक्षाध्यक्ष शरद पवार यांना सादर केल्याचे समजले. दरम्यान, राजळे यांच्याबद्दल तक्रार करणाऱ्या माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांची पवार यांनी स्पष्ट शब्दांत गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत कानउघडणी केल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पवार यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज, शुक्रवारी मुंबईत बैठक आयोजित केली होती. पराभूत उमेदवार राजळे अनुपस्थित राहिल्याचे सांगितले जाते.
नगर मतदारसंघाची माहिती पिचड व पाचपुते यांनी दिली. मराठा, मुस्लीम आरक्षण आदी मुद्दे पाचपुते यांनी उपस्थित केले. मात्र पवार यांनी त्यांना अडवत राज्याच्या सूचना करण्याऐवजी श्रीगोंद्यात ५८ हजारांनी मागे का, असा प्रश्न केला. नंतर पाचपुते यांनी राजळे यांच्याबद्दल काही तक्रारी केल्या. त्यावर पवार यांनी त्यांना एकदा उमेदवार दिल्यानंतर तक्रारी चालणार नाहीत, उमेदवारासाठी नाहीतर पक्षासाठी काम करा, असेही सुनावल्याचे समजते. लाटेचा गैरफायदा घेत अनेकांनी आपली पापे धुऊन घेतली, त्याबद्दल कठोर भूमिका घ्यावी लागेल, असे पिचड यांनी पवार यांना सांगितल्याने कोणावर कारवाई होणार, याबद्दल पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊ लागली आहे.