राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत बफर झोनमध्ये येणारी २३ गावे ‘नो गो झोन’ जाहीर केल्याने ताडोबात आता नवीन रिसोर्ट वा हॉटेल सुरू होण्याची शक्यता मावळली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र दर्शनाने देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे काही नामांकित हॉटेल्स ग्रुपच्या वतीने येथे रिसोर्ट व हॉटेल सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, परंतु राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने ताडोबालगतच्या २३ गावांत ‘नो गो झोन’ जाहीर केला आहे. त्यामुळे आता नवीन हॉटेल व रिसोर्टला परवानगी मिळणे जवळपास बंद आहे. सध्या ताडोबा प्रकल्पात एकूण १४ रिसोर्ट व हॉटेल सुरू आहेत. यामध्ये सारस रिसोर्ट, रॉयल टायगर रिसोर्ट, ताडोबा टायगर रिसोर्ट, वनविकास महामंडळाचे निसर्ग पर्यटन संकुल, एमटीडीसी रिसोर्ट, इरई रिट्रीट रिसोर्ट, सराई टायगर रिसोर्ट, टायगर ट्रेल रिसोर्ट खुटवंडा, स्वरासा रिसोर्ट, कोलारा, गौरव नेचर स्टे रिसोर्ट, होप इन रिसोर्ट कोलारा, निसर्ग पर्यटन संकुल कोलारा, हेवन रिसोर्ट खडसंगी यांचा समावेश आहे. या प्रत्येक रिसोर्टला दहा कक्षापर्यंत प्रति महिना एका सूटसाठी ५०० रुपये, तर दहा कक्षाच्या वर प्रति महिना एका सूटसाठी ७५० रुपये कंझव्‍‌र्हेशन शुल्क भरावे लागते. दर तीन महिन्याला उपवनसंरक्षक ताडोबा बफर झोन कार्यालयात हे शुल्क जमा करावे लागते.
आता नवीन रिसोर्ट सुरू होण्याची शक्यता मावळल्याने ताडोबातील या रिसोर्टचे दर आकाशाला टेकले आहेत. दुसरीकडे एनटीसीएने २३ गावांत ‘नो गो झोन’ जाहीर केल्याने रिसोर्ट सुरू करण्यास इच्छुक असलेल्या हॉटेल ग्रुपच्या समोर प्रश्न निर्माण झाला आहे. एनटीसीएने मोहुर्ली व परिसरातील इतर गावांतसुद्धा नो गो झोन जाहीर केला आहे. मोहुली वन परिक्षेत्रात सर्वाधिक रिसोर्ट आहेत. त्यामुळे आता या सुरू असलेले रिसोर्ट बंद करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाघ व बिबटय़ांच्या संवर्धनासाठी एनटीसीएने अनेक नवीन अटी लादलेल्या आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या रिसोर्ट मालकांसमोरसुद्धा अनेक प्रश्न आहेत. तर इको टुरिझमअंतर्गत ही बंदी काही दिवसांसाठी मागे घेण्यात यावी, अशीही मागणी काहींनी लावून धरली आहे.
ताडोबात रिसोर्टचा व्यवसाय चांगला असला तरी पावसाळय़ात तीन महिने पर्यटन कायम बंद राहात असल्याने रिसोर्टचा व्यवसाय पूर्णत: ठप्प असतो. अशा काळात रिसोर्ट व हॉटेल पूर्णत: रिकामे असतात, परंतु हिवाळा व उन्हाळय़ात पर्यटकांची कमालीची गर्दी असते. ताडोबात येणाऱ्या बहुतांश पर्यटक मोहुर्ली येथील रिसोर्टमध्ये मुक्कामी असतो. अशा वेळी रिसोर्टमालक पर्यटकांकडून मोठी रक्कम वसूल करतात. अशा वेळी रिसोर्ट व्यावसायिकांवर ताडोबा व्यवस्थापनाने काही र्निबध लावावे, अशी मागणी पर्यटकांकडून समोर आली आहे.  ताडोबात मोजके १४ रिसोर्टस् असल्याने व पर्यटनाच्या काळात सर्व रिसोर्टस् हाऊसफुल्ल राहतात. अशा वेळी रिसोर्टमालक मनमानी रक्कम वसूल करीत असल्याच्यासुद्धा तक्रारी आहेत.
एक तर हॉटेल व रिसोर्टची संख्या कमी, त्यातच नवीन रिसोर्टला बंदी असल्यानेसुद्धा ही मनमानी सुरू असल्याची माहिती पर्यटकांनी दिली.