नाशिकमध्ये आंतरधर्मीय विवाह केलेल्या युगुलाच्या कुटुंबीयांना धमक्या 

नाशिक : विवाहाची पारंपरिक चौकट ओलांडण्याचे धाडस काही मोजकीच मंडळी दाखवतात. मात्र धर्म, संस्कृती आणि परंपरा यांची पट्टी बांधलेला बुरसटलेला समाज पुरोगामित्वाच्या कितीही गप्पा मारत असला तरी अजूनही ही चौकट मोडण्यास तयार नसल्याची अनेक उदाहरणे दिसतात.

नाशिकमध्ये समाजाच्या या त्रासाचा अनुभव नोंदणी पद्धतीने विवाह झालेल्या प्रतिष्ठित घराण्यातील एका प्रेमीयुगुलासह दोन्ही घरातील कुटुंबीयांना आला आहे. दोन्ही कुटुंब आपल्या निर्णयावर ठाम असून समाजाची मानसिकता बदलेल अशी अपेक्षा बाळगून आहेत.

यासंदर्भात आडगावकर यांनी आपले म्हणणे मांडले आहे. रसिका अपंग आहे. तिला तिच्या वैगुण्यासह स्वीकारेल अशा मुलाचा आम्ही शोध घेतला. परंतु हिंदू धर्मातून तिला स्वीकारेल असे कोणीही पुढे आले नाही. त्या वेळी मुलीने आपला मित्र आसिफ याच्याविषयी माहिती दिली. दोघेही पदवीधर असून (पान २ वर)

(पान १ वरून) एकत्र शिकत होते. खान कुटुंबीयांशी आमचा ११ वर्षांपासून संबंध आहे. दोन्ही कुटुंबीयांनी मैत्रीचे धागे नातेसंबंधात गुंफण्याचे ठरवले. दोघांचेही न्यायालयात नोंदणी पद्धतीने लग्न झाले. माझी इच्छा मुलीचे लग्न आपल्या पद्धतीने व्हावे अशी असल्याने आम्ही हिंदू पद्धतीने तिचा विवाह करण्याचे ठरवले. त्याआधीच समाज माध्यमात लग्नपत्रिका आली आणि हा प्रकार घडला. जे गुरुजी हे लग्न लावणार होते, त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी देण्यात आली. हा विवाह सोहळा कुठलाही दबाव, हुंडा किंवा अन्य कारणाने ठरलेला नाही. मुलगी आपल्या नजरेसमोर राहील यामुळे तिला विवाहासाठी पाठिंबा होता, असे आडगावकर यांनी म्हटले आहे.

आपल्या निर्णयामुळे कोणालाही त्रास होऊ नये, म्हणून अखेर आडगांवकर यांनी हिंदू परंपरेनुसार होणारा विवाह सोहळा रद्द केला आहे. मुलीचे हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे सालंकृत कन्यादान करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. हा विधी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुलीची पाठवणी करणार नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. कोणाविषयीही तक्रार नसल्याने पोलिसांकडे न जाण्याचीच त्यांची भूमिका असून त्यांच्या या निर्णयाला खान कुटुंबीयांचाही पाठिंबा आहे.

प्रकार काय?

येथील सराफ व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची मुलगी रसिका तसेच मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा मुलगा आसिफ यांचा विवाह नोंदणी पद्धतीने झाला. हिंदू धर्म परंपरेनुसार १७ जुलै रोजी नाशिक येथे आप्तांच्या उपस्थित विवाह करण्याचे ठरविण्यात आले. त्यांची लग्नपत्रिका समाज माध्यमांत आल्यानंतर जो दबाव वाढला त्यामुळे हा लग्नसोहळा रद्द करावा लागला.

लव्ह जिहादच्या नावाने..

या लग्नाची पत्रिका समाज माध्यमांत पसरल्यावर सामाजिक संघटना, धार्मिक संघटना एकटवल्या. हा प्रकार लव्ह जिहादचा असल्याचा संदेश वेगवेगळ्या माध्यमांतून पसरविला गेला. हा विवाह सोहळा थांबविण्याची मागणी समाजातील काही घटक, धार्मिक संघटनांकडून होऊ लागली. काहींकडून धमक्याही देण्यात आल्या.