विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेली यशस्वी वाटचाल ही भारताच्या प्रगतीचे द्योतक आहे. विज्ञानाची दिशा ही मानवी प्रगती आणि शैक्षणिक सुधारणांची नवी आशा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी केले. येथील गोखले एज्युकेशन सोसायटी संचालित आर. एच. सपट अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी ‘भारतातील उच्च शिक्षणाच्या नव्या दिशा’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, डॉ. जी. टी. पानसे, गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य एस. बी. पंडित, सचिव डॉ. एम. एस. गोसावी, संस्थेच्या विभागीय सचिव डॉ. दीप्ती देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी डॉ. गोवारीकर यांनी देशात होणारे बदल पाहिल्यावर स्वातंत्र्यापूर्वीचे दिवस आठवत असल्याचे नमूद केले. देशाची दिशा बदलत आहे. नव्या दिशा दिसत आहेत. ‘मेक इन इंडिया’ हे बोधवाक्य झाले आहे. भारत महासत्ता होण्याचे चिन्ह दिसत असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला. भारतातील उच्च शिक्षणासंदर्भात भाष्य करताना डॉ. निगवेकर यांनी मानवतेला धरून होत असलेल्या प्रगतीआड आर्थिक टंचाई येत नसल्याचा उल्लेख केला. ज्ञान मिळविण्यासाठी एकाच ठिकाणी केंद्रित राहण्याची गरज आता राहिलेली नाही. देशाबाहेरील तंत्रज्ञानही आपण वापरू शकतो. शिक्षणाकडे आता वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. गोसावी यांनी आधुनिक काळात मार्गक्रमण करताना विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरत आपण ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक ठेवा जतन करावयास हवा, असे मत मांडले. भारताचा महासत्ता म्हणून उदय होण्यासाठी गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाची टक्केवारी वाढण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी सोसायटीच्या वतीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, टाटा मोटर्सचे माजी कार्मिक व्यवस्थापक श्री. श्री. निवासन, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे उपअध्यक्ष ए. डी. शहाणे, सपट इंटरनॅशनलचे अध्यक्ष जगुशेठ सपट आदींना सन्मानित करण्यात आले. तसेच शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थी डॉ. विजय गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी ‘रेझोनन्स’, ‘स्पेक्ट्रम’, ‘एज्युकेअर आणि ‘स्वयंप्रकाश’ या मासिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन डॉ. मोहिनी पेठकर यांनी केले. आभार प्रा. डॉ. के. आर. शिंपी यांनी मानले.