सोलापूर शहरात काल शुR वारी रात्री एकाच दिवशी करोनाबाधित नवे १०२ रुग्ण आढळले असताना दुसऱ्या दिवशी जिल्हा ग्रामीणमध्ये नवीन ४३ बाधित रुग्णांची भर पडली. शहर व जिल्ह्यतील एकूण रुग्णसंख्या तीन हजारांचा टप्पा ओलांडून ३०१९ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडाही २८७ इतका झाला आहे.

दरम्यान, यशस्वी उपचार करून करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १५७९ म्हणजे ५२.३१ टक्के झाली आहे. मृत्यूचे प्रमाण मात्र आता दहा टक्कय़ांच्या खाली ९.५० पर्यंत आले आहे.

काल शुक्रवारी वारी रात्री शहरात ३४२ चाचणी अहवाल प्राप्त झाले असता त्यात १०२ रुग्ण करोनाबाधित असल्याचे दिसून आले. यात दोन मृतांचा समावेश होता. शहरातील पूर्व आणि दक्षिण भागासह अन्य भागातही विखुरलेल्या स्वरूपात बाधित रुग्ण आढळून येण्याचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंत शहरातील रुग्णसंख्या २४९९ इतकी झाली आहे. तर मृतांची संख्याही २६३ झाली आहे. तथापि, रुग्णसंख्या व मृतांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या संशयित व्यक्तींची वैद्यकीय चाचणी करण्याचे प्रमाण घटविण्यात आले आहे. संशयित रुग्णांचा शोध आणि चाचण्या (ट्रेसिंग आणि टेस्टिंग) कमी झाल्यामुळे छुप्या स्वरूपात बाधित रुग्णसंख्या तसेच मृतांची संख्याही वाढत चालल्याची भीती व्यक्त होत आहे. एका बाजूला शासनाने जलद चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या असल्या, तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे.

दुसरीकडे जिल्हा ग्रामीणमध्येही बाधित रुग्णसंख्या वाढून ५२० झाली आहे. शनिवारी सायंकाळी बार्शी शहर व तालुक्यात १४ नवीन बाधित रुग्ण सापडले असून आता तेथील रुग्णसंख्या ९५ झाली आहे. तसेच पाच मृत झाले आहेत. अक्कलकोट शहर व तालुक्यातही नवीन १३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तेथील रुग्णसंख्या ९७ झाली असून त्यात सात मृतांचा समावेश आहे. दक्षिण सोलापुरात नवीन सहा रुग्ण आढळल्यामुळे तेथील रुग्णसंख्या सर्वाधिक म्हणजे २०२ झाली आहे. यात मृतांचा समावेश आहे. पंढरपुरात चार बाधित रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यत आतापर्यंत निश्चिंत असलेल्या मंगळवेढा तालुक्यातही शनिवारी प्रथमच पाटकळ येथे बाधित रुग्ण सापडला आहे.