२४ तासांत नव्याने ११ रुग्ण आढळून आल्याने मालेगाव शहर आणि तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ७०१ वर पोहचली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ८९० झाली आहे.

गुरुवारी रात्री उशिरा मालेगावातील एकूण ९२ अहवाल प्राप्त झाले. त्यात ११ रुग्णांचा अहवाल सकारात्मक असून ८३ जणांचा अहवाल नकारात्मक असल्याचे आढळून आले. सकारात्मक अहवालांमध्ये शहराला लागून असलेल्या द्याने येथील सहा जणांचा समावेश आहे. हे सर्व जण यापूर्वी आढळून आलेल्या रुग्णांचे नातेवाईक तसेच घनिष्ठ संपर्क आलेले आहेत. करोनामुळे दोन दिवसांपूर्वी रावळगाव येथे मृत्यू झालेल्या मालेगाव महापालिकेतील सफाई कर्मचारी महिलेची सून आणि नातीलाही करोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच मोतीबाग नाका, अमन चौक आणि सहारा रूग्णालय येथील प्रत्येकी एक जण करोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. तालुक्यातील रावळगाव, लोणवाडे आणि चंदनपुरी शिवारातील मडकी महादेव वस्तीत करोना संसर्ग रुग्ण आढळून आल्याने सदर परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिले आहेत.

ग्रामीण भागांत १११ रुग्ण

ग्रामीण भागांत करोनाचे आतापर्यंत एकूण १११ रुग्ण आढळले. यात नाशिक तालुका नऊ, चांदवड पाच, सिन्नर नऊ, दिंडोरी नऊ, निफाड १६, नांदगाव १०, येवला ३३, कळवण एक, सटाणा दोन, मालेगाव ग्रामीण १९ यांचा समावेश आहे. एकूण ८९० रुग्णांपैकी ६५४ रुग्ण उपचाराअंती करोनामुक्त झाले. ४६ जणांचा मृत्यू झाला. सध्या विविध रुग्णालयात १९० रुग्ण उपचार घेत आहेत.