सातारा जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत करोनाग्रस्तांची संख्या तब्बल ३० ने वाढून ती ७४ झाली. यामध्ये एकटय़ा कराड तालुक्यातील रुग्णांची संख्या जवळपास ५५ आहे. कराड शहरात ५, शहरालगतच्या वनवासमाचीत सर्वाधिक २६ तर, मलकापूर नगरपालिकाक्षेत्रात १३ रुग्णांची नोंद आहे. कराड तालुक्यात रुग्णांची मोठी साखळी पुढे आल्याने हा विळखा भेदण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.

कोविड-१९ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने कराडकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात आरोग्य सेवेतील अनेकांचा समावेशाबरोबरच स्थानिकांनाही आता हा संसर्ग होऊ लागला आहे. दरम्यान शेकडो संशयितांचे अहवाल अद्याप प्रलंबित असून, ७ अहवाल अनिर्णित आहेत. त्यामुळे करोनाग्रस्तांची संख्या आणखी वाढणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

सातारा जिल्हा रुग्णालयात पुणे कारागृहातून आलेल्या दोघांना करोनाबाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सातारा, फलटण, कोरेगाव, वाईमध्येही रुग्ण मिळून आल्याने करोनाने जिल्हभर हातपाय पसरल्याचे दिसते आहे. दरम्यान, करोनाग्रस्त मिळून आलेल्या सातारा व कराड या दोन प्रमुख शहरांसह करोना संसर्गित रुग्णांचे वास्तव्य व संपर्क राहिलेला संपूर्ण परिसर पुर्णत: कुलूपबंद असून, संशयित रुग्णांचे शोधकार्य गती घेऊन आहे. जिल्ह्यात आजवर ८ रुग्ण उपचारांती सुखरूप स्वगृही परतले असून, २ रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.