सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या २१६ वर पोहोचली आहे. करोनाची  साखळी रोखण्यासाठी जिल्ह्यात दि. २ ते ८ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्यात सरसकट लॉकडाऊन करण्याचा जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयावर राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात आणखी दोन व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या २१६ अशी झाली आहे. पॉझिटीव्ह आलेले दोन्ही रुग्ण हे सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा या गावचे आहेत. हे दोन्ही रुग्ण मुंबई येथून आलेले आहेत. जिल्ह्यातील २१६ करोनाबाधित रुग्णांपैकी १५४ जणांना घरी पाठविण्यात देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.