रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस दररोज सुमारे पन्नासपेक्षा जास्त करोनाबाधित रूग्ण सापडत असून गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील एकूण ७७ रूग्णांचा अहवाल सकारात्मक आला आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ हजार २९०  झाली आहे.

यापूर्वी संशयित करोनाबाधित रूग्णांची फक्त आरटी—पीसीआर चाचणी करण्याची सुविधा रत्नागिरी जिल्ह्यात उपलब्ध होती.  मात्र गेल्या काही दिवसांपासून  अ‍ॅन्टीजेन पद्धतीनेही चाचणी केली जात आहे. विशेषत:  मुंबईहून येणाऱ्या चाकरमानींची या पद्धतीने चाचणी केली जात आहे. त्यामुळे जास्त रूग्ण आढळून येत असल्याचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी नमूद केले.

गेल्या २४ तासांत या पद्धतीने केलेल्या चाचणीमध्ये २२ बाधित रूग्ण सापडले आहेत. याचबरोबर, जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी रत्नागिरी (२२) आणि आणि खेड (१६) या दोन तालुक्यांमध्ये बाधित रूग्ण सापडल्याचे प्रमाण सतत जास्त राहिले. रत्नागिरीच्या शहरी भागातही हे प्रमाण वाढले असून  शहरातील शिवाजी नगर येथे ३ रुग्ण, तर थिबा पॅलेस परिसर,  फगर वठार, मारुती मंदिर, जोशी पाळंद, सन्मित्र नगर, कोकण नगर, माळनाका आणि जेल रोड या परिसरात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा ही त्यामध्ये समावेश आहे.

दिवसभरात दोन क रोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला. त्यात खेडशी (ता. रत्नागिरी) येथील एका ५५ वर्ष वयाच्या व्यक्तीचा अहवाल अ‍ॅन्टीजने टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला होता. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात  दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णाचा मृत्यू येथेच झाला होता. तसेच वांद्री (ता. संगमेश्वर) येथील ५७ वर्षीय रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता ८० झाली आहे.

जिल्ह्यात सक्रिय करोनाबाधित रुग्णांची संख्या ६४३ असून ५६८ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहेत.

दरम्यान,  सोमवारी २२ रुग्ण बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. तसेच गृह विलगीकरणात असलेले ५२ आणि परजिल्ह्यात उपचारासाठी गेलेले ५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे करोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या आता १ हजार ५६८  झाली आहे.