एकाच दिवशी तब्बल नऊ नवे करोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्याचा आकडा शंभरी पार झाला आहे. शहरात सात रुग्ण नव्याने आढळल्याने काही भाग बंद करण्यात आले आहेत. टाळेबंदीत सुट दिल्यानंतर करोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. शासकीय रुग्णालयातून उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाणही चांगले असले तरी बाधितांचा आकडा वाढू लागल्याने प्रशासनासह नागरिकांच्याही चिंतेत वाढ झाली आहे.

बीड  जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी आलेल्या तपासणी अहवालानुसार शहरात सात आणि धारुर तालुक्यात दोन नव्याने रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत करोनाबाधितांच्या आकडय़ाने शंभरी पार केली. टाळेबंदीत तब्बल पन्नास दिवस जिल्ह्याच्या सीमेवरच रोखून धरलेल्या करोनाने नगर माग्रे आष्टीत प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात बाहेरून आलेल्या पाहुण्यांनी सर्वच तालुक्यात करोना पसरविला. एकूण आतापर्यंत करोना बाधितांची संख्या १०७ झाली असून यात रुग्णालयातून बरे होऊन ७७ रुग्ण घरी गेले.

मात्र टाळेबंदीत सुट मिळाल्याने बाहेरचे पाहुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या मार्गाने येत असल्याने करोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. त्यामुळे आता प्रशासनाबरोबर सर्वसामान्य नागरिकांचीही चिंता वाढली आहे. करोनामुळे चार जणांचा मृत्यूही झाला आहे.

करोना बाधित रुग्ण आढळलेल्या भागात आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात असून जवळपास १६ हजारपेक्षा अधिक लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर सव्वा लाख लोकांची तपासणी करण्यात आली असून अंबाजोगाईत करोना तपासणी केंद्र सुरू करण्यात आल्याने तपासणीची संख्या वाढली आहे.