अमळनेरमध्ये आणखी १४ रूग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येने आता शंभरी ओलांडली असून ११४ पर्यंत ही संख्या गेली आहे. दुसरीकडे, पाचोऱ्यात आतापर्यंत १५ जण बाधित झाल्याने १७ मे पर्यंत टाळेबंदी अधिक कठोर करण्याचा निर्णय आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.

अमळनेर येथील ७८ संशयितांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून ६४ अहवाल नकारात्मक आले असून १४ व्यक्तींचे अहवाल सकारात्मक आले आहेत. जिल्ह्यातील ११४ पैकी १४ रूग्णांचा मृत्यू झाला असून तीन रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

दरम्यान, आमदार किशोर पाटील यांनी शुक्रवारी पोलीस, महसूल, पालिका आणि आरोग्य अधिकारी यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन व्हिडिओव्दारे पत्रकार परिषद घेऊन पाचोऱ्यात १० ते १७ मे या कालावधीत टाळेबंदी अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. सात दिवसांच्या या जनता टाळेबंदीस सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रांताधिकारी कार्यालयातील बैठकीत तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले उपस्थित होते. या बैठकीत आमदारांनी प्रतिबंधात्मक उपाय योजनांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली. कठोर टाळेबंदीमुळे रूग्णालयाशी संलग्न वैद्यकीय आणि दूध डेअरीव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने, बाजार समिती आणि भाजीपाला बंद राहणार आहे. रमजान ईद सणाला मुस्लिम बांधवांनी घराबाहेर न पडता घरातच नमाज पठण करण्याची सुचनाही करण्यात आली आहे.