महाराष्ट्रात १०८९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १९ हजार ६३ इतकी झाली आहे. मागील २४ तासात ३७ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. आज १६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आत्तापर्यंत ३ हजार ४७० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज झालेल्या ३७ मृत्यूंपैकी १९ पुरुष तर १८ महिला होत्या. या ३७ जणांमध्ये १७ रुग्ण असे होते ज्यांचं वय ६० वर्षे किंवा त्यावरचं होतं. तर १६ रुग्ण असे होते ज्यांचं वय हे ४० ते ५९ वर्षे असं होतं. ज्या ३७ रुग्णांचा मृत्यू झाला त्या ३७ रुग्णांमध्ये २७ जण असे होते ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार अशा गंभीर आजारांचा पूर्व इतिहास होता. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ७३१ रुग्णांचा मृत्यू करोनाची लागण होऊन झाला आहे.

आत्तापर्यंत २ लाख १२ हजार ३५० जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. ज्यापैकी १९ हजार ६३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १ लाख ९२ हजार १९७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २ लाख ३९ हजार ५३१ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तर १३ हजार ४९४ लोक हे संस्थात्मक क्वारंटाइन आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.