शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड कक्षात बुधवारी तीन जणांचा मृत्यू झाल्याने करोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या ७२, तर जिल्ह्यातील  रुग्णसंख्या एक हजार ४२९ पर्यंत गेली आहे.

शहरात करोनाचा संसर्ग वाढतच आहे. शहरातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण प्रशासनाची चिंता वाढविणारे आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड कक्षातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु असलेल्या धुळे शहरातील तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात तिरंगा चौकातील ७० वर्षांचा पुरूष, साक्री रोड भागातील ४० वर्षांची महिला आणि देवपूर भागातील ६० वर्षांची महिला यांचा समावेश आहे. जिल्ह्य़ातील मृतांमध्ये सर्वाधिक ३७ जण हे धुळे महापालिका क्षेत्रातील, तर ३५ जण जिल्ह्याच्या इतर तालुक्यांमधील रहिवासी आहेत. रुग्णांचा मृत्यूदर रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कृती दल स्थापन करुन उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेण्यात आलेल्या ७४ जणांच्या नमुना तपासणीचे अहवाल गुरूवारी सकाळी प्राप्त झाले. त्यापैकी पाच अहवाल सकारात्मक आले आहेत. तसेच धुळ्यातील खासगी प्रयोगशाळेतील एक अहवाल सकारात्मक आल्याने जिल्ह्य़ातील एकूण रुग्णांची संख्या १४२९ वर पोहचली आहे. यापैकी ९०० रुग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत.

शिरपूर शहरात पुन्हा कडक टाळेबंदी करूनही करोना बाधितांची संख्या कमी झालेली नाही. शिरपूर शहरात करोना रुग्णांचा आकडा ४५० पुढे गेला आहे. धुळे शहरातही ६०० हून अधिक करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात सम-विषम तारखेला व्यापारी प्रतिष्ठाने आणि दुकाने उघडण्यात येत असतांनाही नागरिकांची बाजार पेठांमधील गर्दी कमी होत नाही. तसेच काही जण मुखपट्टी न बांधताच फिरतांना दिसतात. परिणामी, शहरात करोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत.

 धुळ्यातील व्यापारी संकुले पालिकेकडून बंद

धुळे शहर आणि जिल्हा करोना रूग्णसंख्येतील वाढीमुळे लाल क्षेत्रात कायम असल्याने गुरूवारी शहरातील मोठी व्यापारी संकुले, शॉपिंग मॉल अनिश्चित काळासाठी बंद करण्याची कारवाई महापालिकेच्या वतीने करण्यात आली. आयुक्त अजिज शेख यांच्या आदेशानुसार मनपाच्या पथकांनी शहरातील मनपाच्या मालकीचे मॉल आणि व्यापारी संकुले बंद केली. यात प्रामुख्याने गरुड शॉपिंग कॉम्प्लेक्स, महापालिकेसमोरील प्रबोधनकार शॉपिंग, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण संकुल बंद करण्यात आले. यावेळी दुकानदारांनी मनपाच्या पथकाला विरोध केला. अचानक दुकाने बंद करण्याची ही कारवाई अन्यायकारक असून आधीच तीन महिने टाळेबंदीने व्यापार, उद्योगाची वाट लागली आहे. आता सम-विषम पध्दत, दुपारी चापर्यंतच दुकाने सुरु ठेवा, या नियमांमुळे अर्धा दिवस व्यवसाय करुन उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करीत असतांना पुन्हा एकदा दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय तुघलकी असल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे.