21 January 2021

News Flash

वसईत आगी लागण्याच्या संख्येत १४४ ने घट

वर्षभरात आगीच्या ६५९ घटना

(संग्रहित छायाचित्र)

कल्पेश भोईर

टाळेबंदीमुळे वसई-विरार शहरातील आगीच्या दुर्घटना  घडण्याच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.

वसई-विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात वर्षभरात ६५९ घटना घडल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत आगी लागण्याच्या संख्येत १४४ ने घट झाली आहे.  शहरात अनेक लहान-मोठय़ा औद्योगिक वसाहती, गोदामे, विद्युत उपकरणे, यासह इतर ठिकाणी अधूनमधून आगी लागण्याचे प्रकार घडतात. या आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळविले जाते. शहराचे झपाटय़ाने नागरीकरण वाढू लागले आहे. त्यामुळे अग्निसुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. यासाठी एकामागून एक अत्याधुनिक साधने, वाहने अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होत असल्याने अग्निशमन दलाची क्षमता वाढली आहे.

सन २०१९ मध्ये शहरात ८०३ ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्या होत्या. तर सन २०२० मध्ये ६५९ इतक्या आगीच्या दुर्घटना घडल्या आहे. यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत १४४ ने घट झाली आहे.

मागील काही वर्षांपासून वसईच्या औद्योगिक वसाहतीत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करावे लागते. वर्षभरात जवळपास ६५९ आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या घटनांमध्ये ३६ जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली आहे. तसेच वर्षभरात वादळी वाऱ्यामुळे शहरात ६४१ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तर अडकून पडलेले ३३३ प्राणी व ३४१ पक्षी यांचीही सुखरूप सुटका केली आहे. करोनाच्या संकटामुळे सर्व काही ठप्प असल्याने आगीच्या घटनांमध्येदेखील घट झाली आहे.

सापांची संख्या वाढली..

वसई-विरार  शहरातील बहुतेक परिसराला लागूनच नाले व जंगल परिसर गेल्याने  साप थेट नागरी वस्तीत शिरकाव करू लागले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सापांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. सन २०१९ मध्ये २ हजार ७२३   तर सन २०२० या वर्षांत ४ हजार ५६० सापांना जीवदान दिले. म्हणजेच १ हजार ८३७ ने सापांच्या रेस्क्यू संख्येत वाढ झाली आहे. त्यामध्ये नाग, धामण, फोर्से, अजगर, मणेर, घोणस अशा विविध प्रजातींचे साप पकडण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. पकडून आणलेले साप पुन्हा नागरी वस्तीमध्ये घुसू नयेत यासाठी त्यांना सुरक्षितरीत्या जंगलात सोडून दिले जात आहे.

आग दुर्घटना आकडेवारी

वर्ष आग दुर्घटना संख्या

२०१७ –     ६८६

२०१८ –     ८१९

२०१९ –     ८०३

२०२० –     ६५९

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 12:01 am

Web Title: number of fires in vasai has decreased by 144 abn 97
Next Stories
1 पालघर जिल्ह्यात प्रथमच काळा भात
2 “नेमकं काय म्हणायचं आहे…,” उद्धव ठाकरेंनी नामांतराचं समर्थन केल्यानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया
3 पाहणीसाठी आले आणि थेट उद्घाटनच केलं; उदयनराजेंचं धक्कातंत्र
Just Now!
X