इंधनाच्या मूल्यवर्धित करात सवलत देण्याची विमान कंपन्यांची मागणी

औरंगाबाद : औरंगाबादहून देशांतर्गत विमान उड्डाणे वाढवायची असतील तर इंधनाच्या मूल्यवर्धित करात आणखी सूट द्यावी, अशी मागणी विविध विमान कंपन्यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे केली आहे. तसेच, परदेशी उड्डाणांमध्ये होणारे नुकसान भरून काढण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान उपलब्ध व्हावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. औरंगाबादहून सध्या केवळ तीन शहरांसाठी पाच विमानांची उड्डाणे होतात. दिल्ली, मुंबई व हैदराबाद येथे जाण्यासाठी अधिक उड्डाणे व्हावीत, अशी मागणी ‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’च्या वतीने हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीचा विचार करण्यासाठी केंद्रीय अतिरिक्त सचिव उषा पाधी व  रुबिना अली यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीस खासदार चंद्रकांत खरे यांचीही उपस्थिती होती.

गेल्या काही वर्षांत उड्डाणे नसल्यामुळे औरंगाबादहून पुणे आणि मुंबई येथे जाऊन अन्यत्र प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ आणि पैसा अधिक वाया जातो. त्यामुळे औरंगाबादहून विमानांची उड्डाणे वाढली तर तिकिटाच्या दरातही घट होईल, असे सांगण्यात येत आहे. उद्योजकांच्या संघटनेने या अनुषंगाने एक सादरीकरणही केले. यामध्ये कोठे सेवा आवश्यक आहे, याची माहिती देण्यात आली. चेन्नई, बंगळूरु, जयपूर या शहरांशिवाय बुद्धिस्ट सर्किटमधूनही उड्डाणे होऊ शकतात. सोमवारी विविध विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. हवाई मार्ग नियोजन अधिकाऱ्यांनी हिवाळी उड्डाणांचे नियोजन करताना काही विमान उड्डाणे औरंगाबादहून देता येतील, असे सांगितले. औरंगाबाद-बंगळूरु, दिल्ली-औरंगाबाद अशा सेवा सुरू करण्यास सकारात्मक असल्याचे सांगितले. येत्या दोन महिन्यांत देशांतर्गत काही शहरांमध्ये सेवा सुरू होऊ शकते, असे सोमवारी सांगण्यात आले आहे. या नव्या घडामोडीमुळे उत्तर आणि दक्षिण भारताशी संपर्काचा वेळ कमी होण्याची शक्यता असल्याचे सीएमआयचे अध्यक्ष राम भोगले यांनी सांगितले.

मुंबईच्या विमानतळाहून आता ९६० उड्डाणे होतात. येथे विमान थांबण्यासाठी आता जागा उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे औरंगाबादसारख्या ठिकाणी अधिक विमान थांबे होऊ शकतात. त्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. मात्र औरंगाबादहून अधिक विमान उड्डाणे करावयाची झाल्यास कंपन्यांना नुकसान होऊ नये अशा प्रकारे इंधन सवलतीमध्ये अनुदान द्यावे, अशी विमान कंपन्यांची मागणी आहे. अन्य शहरांच्या तुलनेत औरंगाबादला विमान उड्डाण करणाऱ्या कंपन्यांना केवळ पाच टक्के मूल्यवर्धित कर आकारला जातो. तो अन्य शहरांच्या तुलनेमध्ये कमी असला तरी त्यात आणखी कपात व्हावी, अशी विमान कंपन्यांची मागणी आहे.

बुद्धिस्ट सर्किटसाठी श्रीलंका एअरलाइन्स पर्याय

औरंगाबाद जिल्ह्य़ातील वेरूळ आणि अजिंठा लेणी पाहण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक येतात. श्रीलंकेच्या एअरलाइन्सकडून औरंगाबादला विमान सुरू करण्यासाठी कोणतीही अडचण भासणार नाही. पण आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यासाठी मात्र विमान कंपन्यांना अनुदान देण्याची गरज असल्याचे सोमवारच्या बैठकीतून पुढे आले. किमान तोटा होणार नाही एवढे अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. केंद्रातील अधिकारी गंगाधरन यांनीही अशा प्रकारचे अनुदान देता येऊ शकते, तशी भारत सरकारची योजना असल्याचे सांगण्यात आले. नव्याने आयकॉनिक शहरामध्ये औरंगाबादचा समावेश असल्यामुळे या पर्यायावर विचार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आणखी दोन फेऱ्या

ऑक्टोबरपासून औरंगाबाद शहरातून नवीन दोन विमाने सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. जेट एअरवेजची औरंगाबाद- दिल्ली अशी थेट विमानसेवा सुरू होईल, तर दिल्ली-बंगळूरु अशी विमानसेवा झूम एअरवेज सुरू करेल, अशी चर्चा सोमवारच्या बैठकीमध्ये झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

बसप्रवासी वळविण्याचा प्रयत्न

औरंगाबादहून मुंबईला साधारणत: ३५ खासगी बस जातात. नागपूरला २५ बस जातात. अहमदाबाद, हैदराबाद येथे बस जातात. त्यातील २० टक्के प्रवासी हवाई मार्गाने प्रवास करू शकतात, असा अंदाज सोमवारच्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

मागण्या अशा..

* दिल्ली, चेन्नई, अहमदाबादला थेट विमानसेवा हवी.

* विमानतळाचा नाईट पार्किंगसाठी उपयोग व्हावा.

* मुंबईहून औरंगाबादला येण्यासाठी सायंकाळी विमानसेवा हवी.

हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबत दोन महिन्यांपूर्वी बैठक घेण्यात आली होती. त्यांनी शहराची क्षमता आणि हवाई वाहतूक याचा एक आढावा घेण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. विमान कंपन्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा करण्यासाठी एक बैठक घेण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार आज घेण्यात आलेल्या बैठकीस हवाई मार्ग नियोजन करणारे अधिकारी आणि केंद्रीय अतिरिक्त सचिवांसमवेत चर्चा झाली. येत्या दोन महिन्यांत देशांतर्गत विमान उड्डाणे वाढतील, अशी आशा आहे.

– राम भोगले, अध्यक्ष, सीएमआयए