जिल्ह्य़ात येणाऱ्यांचे प्रमाण निम्म्यावर

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा गणेशोत्सावर र्निबधांचे सावट आहे. या निर्बंधामुळे रायगड जिल्ह्य़ात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांचे प्रमाण निम्म्याहून अधिक घटले आहे.

उत्सवप्रिय कोकणात गणेशोत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. या सणानिमित्ताने मुंबई, पुणे आणि ठाणेसारख्या महानगरातील लाखो कोकणस्थ गणेशभक्त आवर्जून आपल्या मूळ गावी येत असतात. सात दिवस मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. गौरी-गणेश विसर्जनानंतर हे सर्व जण आपआपल्या घरी परतत असतात. यंदा मात्र जिल्ह्य़ात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांची संख्या घटली आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी दोन ते अडीच लाख गणेशभक्त जिल्ह्य़ात दाखल होत असतात. यंदा मात्र हे प्रमाण निम्म्याहून कमी असल्याचे सांगितले जाते.

जिल्ह्य़ात यंदा १ लाख ५२६ गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यात २८७ सार्वजनिक, तर १ लाख २३९ घरगुती गणेशमूर्तीचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महावितरण विभाग आणि महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश जारी करण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक विभागाचे आपले नियोजन पूर्ण केले आहे.

कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रायगड पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक नियंत्रित करण्यात येत आहे. महामार्गावर वडखळ येथे दरवर्षी वाहतूक कोंडी होत असते. या वर्षी मात्र वडखळ बायपास मार्ग आणि उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटला आहे. तर वाहतूक नियंत्रणासाठी खारपाडा, पेण, सुकेळी खिंड, वाकणफाटा, कोलाड आणि माणगाव, नाते खिंड आणि कशेडी घाटात पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी २५ पोलीस अधिकारी आणि २१२ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रुग्णवाहिका, क्रेन्स आणि जेसिबी तैनात करण्यात आले आहेत.

राज्य सरकारने १२ ऑगस्टनंतर कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांना करोना चाचणी बंधनकारक केली आहे. त्याचबरोबर ई-पासची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा रायगड जिल्ह्य़ात येणाऱ्या गणेशभक्तांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे यंदा महामार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्हा प्रशासनाने यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवरही निर्बंध घातले आहेत. घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांपर्यंतच असाव्यात, तर सार्वजनिक गणेशमूर्ती चार फुटांपर्यंतच असाव्यात असे आदेश काढण्यात आले आहेत. गणेशमूर्तीच्या मिरवणुकांवरही प्रतिबंध घातला आहे. विसर्जनासाठी समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्रशासनामार्फतच गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्य़ात गणेशोत्सवाच्या उत्साहावर र्निबधाचे सावट आहे.

महामार्गावरील अवस्था बिकटच

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी असे निर्देश राज्य सरकारने दिले होते. खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दुरुस्ती कामांचा दोन वेळा आढावा घेण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाला सूचना दिल्या होत्या.

मात्र तरीही महामार्गाची अपेक्षित दुरुस्ती होऊ शकली नाही. वडखळ ते गडब, कोलाड ते इंदापूर, माणगाव आणि महाड ते पोलादपूरदरम्यान महामार्गाची बिकट अवस्था कायम आहे. खडी आणि माती टाकून खड्डे बुजविण्याचे प्रयत्न पुरते फसले आहेत. पावसामुळे रस्त्याची चाळण झाली आहे.

करोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्तीच्या मिरवणुका काढण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्यांवर विसर्जनासाठी स्थानिक नगरपालिका आणि ग्रामपंचायतींमार्फत व्यवस्था केली जाईल. उत्तरपूजा करून गणेशमूर्ती संबंधित यंत्रणांकडे सोपवाव्यात, समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी करू  नये. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

– अनिल पारसकर, पोलीस अधीक्षक, रायगड

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्य़ात येणाऱ्या गणेशभक्तांना करोना चाचणी करणे बंधनकारक आहे. एसटी बस, रेल्वेने येणाऱ्या गणेशभक्तांना ई-पासची आवश्यकता नाही, पण खासगी वाहनांनी येणाऱ्या सर्वाना ई-पास बंधनकारक आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता गणेशोत्सव साजरा करावा.

– निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड