ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून राज्यातील करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी पुढील काळातही आपणास सतर्क राहावे लागणार आहे. त्यामुळे करोना निदानाच्या संदर्भातील प्रयोगशाळा चाचण्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरू राहणार आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयांच्या पातळीवर असलेली करोना उपचाराची सध्याची व्यवस्था ही आणखी काही काळ आहे तशीच राहणार आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. अद्याप करोनाचा धोका टळलेला नसल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यात येत्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली असून संभाव्य लाटेच्या अनुषंगाने कृती योजना तयार करण्यास जिल्हापातळीवरील संबंधित यंत्रणांना कळविले आहे. या संदर्भाने ‘लोकसत्ता’शी बोलताना टोपे म्हणाले, राज्यातील आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांची अलीकडेच बैठक घेतली. त्या वेळी आपण पुढील दोन-तीन महिन्यांतील करोनाच्या संभाव्य परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्ण कमी होत असले तरी भविष्यातील सावधानतेच्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली. दिल्ली आणि केरळमध्ये करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. युरोपीय देशांमध्येही करोनाची लाट पुन्हा आली आहे.

करोना उपचारासाठी राज्यातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये आवश्यक आरोग्य यंत्रणा सध्या उपलब्ध आहे. ही यंत्रणा आहे तशीच ठेवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी करोना रुग्ण कमी झाले त्या रुग्णालयात करोनाच्या व्यतिरिक्त अन्य रुग्ण ५० टक्क्यांपर्यंत घेतले जात आहेत. परंतु भविष्यात गरज भासली तर अशा ठिकाणी पूर्वीप्रमाणेच करोना रुग्ण घेतले जाणार आहेत. खासगी रुग्णालयातही भविष्यात गरज भासली तरी ८० टक्के करोना रुग्ण घ्यावे लागणार आहेत. जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना यासंदर्भात अधिकार देण्यात आले आहेत. राज्यात यापूर्वी करोना रुग्णांची उच्चांकी संख्या जेव्हा होती त्यापेक्षा २५ टक्के अधिक रुग्ण व्यवस्थेचे नियोजन पुढील काही महिन्यांसाठी करण्यात येणार आहे.

राज्यात आतापर्यंत जवळपास १७ लाख ५० हजार करोना रुग्ण आढळले असून त्यापैकी १६ लाख १८ हजारांपेक्षा अधिक म्हणजे ९३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. टाळेबंदीमध्ये शिथिलता केली जात असली तरी त्यासंदर्भातील नियमांचे पालन जनतेने केले पाहिजे. तसेच हातांची स्वच्छता, अंतरनियमांचे पालन आणि मुखपट्टय़ांचा वापर केला पाहिजे, असेही टोपे म्हणाले.

आरोग्य यंत्रणेस निर्देश

करोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी युरोपीय देशांची उदाहरणे पाहता राज्यात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी व्यक्त केली आहे.

करोना चाचण्या सुरू ठेवाव्यात, फ्ल्यूसदृश आजारांचे नियमित सर्वेक्षण करावे, एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम राबवावा, करोना प्रसाराची अधिक शक्यता असणाऱ्या ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींच्या चाचण्या वाढवाव्यात, संभाव्य लाटेच्या संदर्भात कृती योजना तयार कराव्यात इत्यादी सूचना त्यांनी संबंधित आरोग्य यंत्रणेस केल्या आहेत. करोनासंदर्भात ग्रामीण व शहरी भागात ‘फीव्हर क्लिनिक’ महत्त्वाचे ठरणार असल्याचेही डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.

राज्य कृती दलाच्या सूचना

करोनासंदर्भातील राज्य पातळीवरील कृती दल आणि मृत्यू अंकेक्षण समितीची बैठक टोपे यांनी नुकतीच घेतली. मृत्युदर कमी करणे आणि भविष्यात पुन्हा करोना विषाणू संसर्ग वाढला तर उपाययोजनांच्या पूर्वतयारीबाबत चर्चा या बैठकीत झाली. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजीव ओक, मृत्यू अंकेक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी यासंदर्भातील प्रयोगशाळा चाचण्या वाढवाव्यात त्याचप्रमाणे ताप आलेल्या रुग्णांच्या तपासण्या वाढविण्याची आवश्यकता या बैठकीत व्यक्त करण्यात आली.