जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने शुक्रवारी दोन हजाराचा टप्पा पार केला आहे. जिल्हय़ात आतापर्यंत एकूण २०२६ रुग्ण आढळून आले. २१ नव्या रुग्णांची भर शुक्रवारी पडली. रॅपिड टेस्टमध्ये आढळून आलेल्या ४६ रुग्णांचीही आज नोंद घेण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात ९९ रुग्ण दगावले आहेत.

जिल्हय़ात करोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. जिल्हय़ात पुन्हा एकदा मोठय़ा संख्येने रुग्णवाढ झाली. सुदैवाने आज मृत्यूची नोंद झाली नाही. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण ४२३ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ४०२ अहवाल नकारात्मक, तर २१ अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या २६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल रात्री रॅपिड टेस्टमध्ये ४६ रुग्ण आढळून आले होते. एकूण रुग्णसंख्येत आज त्याचा समावेश करण्यात आला. आज दिवसभरात सवरेपचार रुग्णालयातून तीन, कोविड केअर केंद्रामधून २२, खासगी हॉटेलमधून दोन असे एकूण २७ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्हय़ातील १६६७ जण करोनामुक्त झाले आहेत.

आज दिवसभरात २१ जणांचे अहवाल सकारात्मक प्राप्त झाले आहेत. सकाळी प्राप्त अहवालात १५ रुग्ण आढळून आले. त्यात सात महिला व आठ पुरुष आहेत. त्यामध्ये अकोट, मूर्तिजापूर, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, तर बोरगाव मंजू, लोकमान्य नगर, सिद्धिविनायक रुग्णालय, शंकरनगर, रामनगर, जीएमसी वसतिगृह, तेल्हारा, बादखेड ता.तेल्हारा, पातूर येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळी सहा जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात दोन महिला व चार पुरुष आहेत. ते मोठी उमरी, सातव चौक, सिंधी कॅम्प, लोहारा ता. बाळापूर, मूर्तिजापूर, हिवरखेड ता. तेल्हारा येथील रहिवासी आहेत.