जिल्ह्यातील २८ जणांना आज, शुक्रवारी करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. त्यातील तब्बल २४ जण नगर शहरातील आहेत. त्यामुळे नगर शहरातील रुग्णसंख्येने शतक ओलांडून ती १२५ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता ३८२ झाली आहे. त्यातील १०५ जणांवर उपचार सुरू आहेत.

नगर शहरासह यापूर्वी संगमनेरने रुग्णसंख्येचे शतक ओलांडले आहे. गेल्या दोन दिवसात तोफखाना भागात १९, वाघगल्लीत १३, तर सिद्धार्थनगरमध्ये १० जण बाधित आढळले आहेत. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ७० जणांची चाचणी नकारात्मक आली होती. तसेच ५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये संगमनेरमधील ३, पाथर्डी व पारनेर मधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आत्तापर्यंत २६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सायंकाळी जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या करोना चाचणी प्रयोगशाळेमध्ये २८ व्यक्तींचे अहवाल सकारात्मक आढळून आले. यामध्ये नगर शहरातील २४, कर्जत तालुक्यातील २, जामखेड व शिर्डी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १०५ इतकी झाली आहे. आज नगर शहरातील सिद्धार्थनगर भागात ६, नालेगाव भागातील वाघगल्लीत ४,  तोफखाना भागात १२ आणि सिव्हिल हडको भागात २ रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय शिर्डी येथे एक आणि कर्जत तालुक्यातील आळसुंदे येथे दोन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जामखेड तालुक्यातील जवळके येथे एक रुग्ण बाधित आढळून आला आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

संगमनेरमधील महिलेचा मृत्यू ‘सारी’ आजाराने?

संगमनेर शहराच्या नाईकवाडपुरा भागातील एका ५० वर्षीय महिलेचा नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची व या महिलेला करोना संसर्ग झाला असल्याची माहिती समजली. जिल्हा रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांच्याशी संपर्क साधला असता माहिती मिळू शकली नाही. मात्र जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हा मृत्यू ‘सारी’ आजारामुळे झाल्याचे सांगितले.