युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ‘मुंबई नाईटलाईफ’च्या प्रस्तावावरून अमरावतीत आगळेच युद्ध सुरू झाले असून अलीकडे नेत्यांचे पुतळे जाळण्याची जणू स्पर्धाच येथील राजकमल चौकात लागली आहे. वीस-पंचवीस कार्यकर्ते धावत येतात काय आणि घोषणा देत पाच-दहा मिनिटात पुतळा जाळून पळून जातात काय.. या प्रकारांमुळे परिसरातील दुकानदारही चक्रावून गेले आहेत आणि पोलिसांचाही मनस्ताप वाढला आहे.

मुंबईत रात्री उशिरापर्यंत उपहारगृहे, मॉल्स, करमणुकीची केंद्रे सुरू ठेवण्याविषयी आदित्य ठाकरे यांनी प्रस्ताव मांडल्यानंतर त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. गेल्या रविवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी याच विषयावरून राजकमल चौकात आदित्य ठाकरे यांचा निषेध नोंदवला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टरचे दहन केले. त्यावर भाजपकडून प्रतिक्रिया उमटण्याऐवजी बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेची शाखा असलेल्या विद्यार्थी स्वाभिमान संघटनेने हा मुद्दा उचलला.
मुख्यमंत्र्यांचे पोस्टर जाळण्याचा निषेध म्हणून या संघटनेने बुधवारी आदित्य ठाकरे यांचे पोस्टर राजकमल चौकात जाळले. यावर पुन्हा युवा सेना पेटून उठली. आदित्य ठाकरे यांचे पोस्टर जाळल्याच्या निषेधार्थ युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे गुरुवारी राजकमल चौकात दहन केले. ‘नाईट लाईफ’मुळे भारतीय संस्कृतीवर आणि विद्यार्थ्यांवर विपरित परिणाम होणार असल्याचे सांगून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या प्रस्तावाचा जाहीर निषेध केला होता, पण त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर जाळण्याची कृती अनेकांना पचनी पडली नाही.
त्यावर कडी म्हणजे भाजपमधून निषेधाचा सूर उमटण्याऐवजी रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी या घटनेला विरोध केला. आदित्य ठाकरेंना विदर्भात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा देखील या कार्यकर्त्यांनी दिला. दुसरीकडे, रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचे पोस्टर जाळल्याचे पाहून संतप्त झालेल्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी राणा यांचा पुतळा राजकमल चौकात जाळला. पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधीच कार्यकर्त्यांनी तेथून पळ काढला. चारही घटनांमध्ये राजकमल चौकच साक्षीदार ठरला आहे. पोलिसांसाठी देखील ही डोकेदुखी ठरली आहे. आता हे प्रकरण कोणत्या वळणावर जाते, याची उत्सुकता ताणली गेली आहे.