21 October 2018

News Flash

नांदेडमध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये घट

जानेवारी ते डिसेंबर २०१७ या एका वर्षांच्या कालावधीत जिल्ह्य़ातील १५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

वर्षभरात १५३ घटना

जानेवारी ते डिसेंबर २०१७ या एका वर्षांच्या कालावधीत जिल्ह्य़ातील १५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यापैकी या महिन्यातील १५ प्रकरणे तर नोव्हेंबर महिन्यातील एक प्रकरण चौकशीच्या स्तरावर असून एकूण ११२ जणांना प्रत्यक्ष मदत देण्यात आली आहे. २०१६ मध्ये आत्महत्यांचे प्रमाण १८० इतके होते. तर २०१५ मध्ये १९० जणांनी आत्महत्या केली होती.

अपुरा पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे किडीचे आक्रमण तसेच शेतीमालाला मिळणारा कमी भाव, डोक्यावर बँकेचे कर्ज अशा दुष्टचक्रात होरपळणारा शेतकरी वैफल्यग्रस्त होऊन शेवटी आत्महत्येचा मार्ग चोखाळतो. सन २००० मध्ये विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सर्वप्रथम सुरू झाले. त्यानंतर ते मराठवाडय़ात पोचले. या दोन्ही भागात पावसाचे प्रमाण तुलनेने कमीच आहे. शिवाय सिंचनाच्या सुविधा अत्यंत तोकडय़ा असून जे काही प्रकल्प सुरू आहेत, ते रखडलेले आहेत. त्यामुळे शाश्वत पाण्याची उपलब्धता नाही. त्यातच भूगर्भातून सतत होणारा पाण्याचा उपसा यामुळे भूजलस्तरही घटला आहे.

या परिस्थितीत शेती बेभरवशाची झाली असून अनेकदा तर पेरणीचा खर्चही निघत नाही. एखाद्या वर्षी सरासरीएवढा पाऊस पडतो आणि पुढचे सलग तीन-चार वर्ष पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. २०१६ मध्ये सरासरी एवढा पाऊस झाला होता. तत्पूर्वीच्या उन्हाळ्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामेही मोठय़ा प्रमाणात झाली. त्यामुळे खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम चांगले झाले. पण, गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी पाऊस पडला. त्यामुळे यंदाच्या वर्षी पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

११२ कुटुंबांना अर्थसा

२०१७ या संपूर्ण वर्षांत १५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जानेवारी, फेब्रुवारी, जुलै या तिन्ही महिन्यांत प्रत्येकी ११, मार्चमध्ये १५, एप्रिल व ऑक्टोबरमध्ये प्रत्येकी १३, मे, ऑगस्ट व नोव्हेंबरमध्ये १४, जून व सप्टेंबरमध्ये प्रत्येकी १० तर डिसेंबरमध्ये १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. एकूण १५३ प्रकरणांपैकी ११२ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली तर २५ प्रकरणे अपात्र ठरली. ११२ कुटुंबांना शासकीय अर्थसा देण्यात आले. आणखी १६ प्रकरणे चौकशीस्तरावर आहेत.

First Published on January 13, 2018 3:30 am

Web Title: number of suicide cases of farmers decreased in nanded