प्रशांत देशमुख

करोनाव्यतिरिक्त अन्य विषाणूंमुळेही मोठय़ा प्रमाणात मृत्यू होत असतात. त्यामुळे अन्य विषाणूची चाचणी न करता केवळ करोनाच अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची आरोग्य खात्याची भूमिका वैज्ञानिकदृष्टय़ा चुकीची आहे, असे स्पष्ट मत न्यायवैद्यक तज्ज्ञ डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी मांडले आहे. इतर विषाणूंसाठीही चाचण्या घेण्याचे आवाहन त्यांनी सरकारकडे केले आहे.

‘करोना किंवा इतर कुठल्याही विषाणू किंवा जीवाणूमुळे होणाऱ्या श्वसनजन्य संक्रमणात दिसून येणारी लक्षणे जवळपास सारखीच असतात. भारतात दरवर्षी वेगवेगळ्या श्वसनजन्य संक्रमणाने ३ लाख ४० हजार व क्षयरोगाने जवळपास ३ लाख ७५ हजार मृत्यू होतात. विविध सर्व कारणांसह देशात दरवर्षी ९६.०५ लाख मृत्यू होतात. म्हणजेच रोज २६ हजार मृत्यू संक्रमण, श्वसनजन्य संक्रमण, क्षयरोग, नैसर्गिक मृत्यू, अनैसर्गिक मृत्यू तसेच अज्ञात कारणाने होत असल्याची ‘लॅन्सेट’ची आकडेवारीही डॉ. खांडेकर यांनी दाखला म्हणून दिली.

करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक किंवा अनिर्णीत असला तरी मृत्यूचे वैद्यकीय कारण करोनाच द्या, असा सरकारचा आग्रह आहे. जागतिक आरोग्य संघटनेने असे निर्देश देण्याची बाब वैद्यकीय वर्तुळासाठी धक्कादायक आहे. मृत्यूचे कारण करोनाच दिले जात असल्याने मृत्यूची संख्या अकारण वाढलेली दिसेल, याकडेही डॉ. खांडेकर यांनी लक्ष वेधले.

बऱ्याच प्रकरणांत मृत्यूला केवळ एकच विषाणू कारणीभूत नसतो, हे वैद्यकीय तथ्य समजून घेतले पाहिजे. बरेचशे इतर जीवाणू-विषाणूंमूळेसुद्धा मृत्यू ओढवतो. फक्त करोना चाचणी होत असल्याने इतर विषाणूंमूळे दरवर्षी होणाऱ्या लाखो मृत्यूंचा यावेळी उल्लेखच होत नाही. ही बाब अत्यंत चुकीची व वैज्ञानिक कसोटीवर टिकणारी नसल्याचेही डॉ. खांडेकर यांनी स्पष्ट केले.

इतर विषाणूंकडे दुर्लक्ष

भारतात वेगवेगळ्या श्वसनजन्य संक्रमणाने दरवर्षी ३ लाख ४० हजार आणि क्षयरोगाने जवळपास ३ लाख ७५ हजार जणांचा मृत्यू होतो. मात्र, ही बाब दुर्लक्षित करून फक्त करोनामुळे मृत्यू होत असल्याचे चित्र निर्माण करणे अयोग्य आहे, असे डॉ. खांडेकर यांनी म्हटले आहे.