ससून रूग्णालयातील १० परिचारिकांच्या अचानक बदल्या केल्याच्या निषेधार्थ उद्यापासून (सोमवार) बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय परिचारिका संघटनेकडून घेण्यात आला आहे. तर बी.जे.महाविद्यालयात स्टायपेंड वाढीच्या मुद्द्यावरून शिकाऊ डॉक्टर मागील पाच दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागत असताना. आता परिचारिका देखील उद्यापासून संपावर गेल्यावर रुग्णांना आणखी फटका बसणार आहे. या दोन्ही संपावर ससून रुग्णालय प्रशासन कशा प्रकारे उपाय करते हे पाहावे लागणार आहे.

परिचारिकांच्या संपाविषयी संघटनेच्या अध्यक्षा अनुराधा आठवले म्हणाल्या की, राज्य शासनाची १४ वैद्यकीय रुग्णालये असून या कोणत्याही रुग्णालयात परिचारिकांची बदली झाली नाही. मात्र ससून रुग्णालयातील १० परिचारिकांची बदली करण्यात आली आहे. या बदल्या वरिष्ठांच्या आकसापोटी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या बदल्याचा त्यांनी निषेध केला. या संपामध्ये तिन्ही शिफ्टमध्ये ६०० महिला काम करतात. या सर्वजण या संपात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जोवर या बदल्या रद्द करत नाहीत तोवर हा संप चालू राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.