दैठण्याचे भूमिपुत्र आणि सीमा सुरक्षा दलात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे एन.एस.जी. कमांडो रामचंद्र बन्सीधर कच्छवे हे पटियाला पंजाब येथे रात्रीच्या गस्ती दरम्यान खड्डय़ात पडले. त्यांच्या डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचे निधन झाले. उद्या मंगळवारी (दि. १७) सकाळी १० वाजता दैठणा येथे शासकीय इतमामात कच्छवे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
पटियाला (पंजाब) येथे रात्रीच्या गस्तीवर असताना १ जून रोजी रात्री कमांडो रामचंद्र कच्छवे १० ते १५ फुटांच्या खोल खड्डय़ात पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते बेशुद्ध अवस्थेत होते. कच्छवे यांच्यावर पठाणकोट येथील रावी खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. १५ जून रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
१९९९ मध्ये सीमा सुरक्षा दलात दाखल झालेल्या रामचंद्र कच्छवे यांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेतील कांगो येथे सहा महिने शांतिसनिक म्हणूनही त्यांनी काम केले होते.
रामचंद्र कच्छवे यांच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ, पत्नी, मुलगा अथर्व असा परिवार आहे. रामचंद्र कच्छवे यांचे वडील बन्सीधरराव कच्छवे यांनीही भारतीय सन्यदलात यशस्वी सेवा बजावलेली आहे. वडिलांच्या प्रेरणेतूनच रामचंद्र कच्छवे हे सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते.