करोना बाधित असल्याचे लपविण्यात आल्यामुळे अनेकांना संसर्ग झाल्याचे प्रकार राज्यातील विविध भागांत घडले आहेत. नागपूर, मुंबई, वसई आणि नवी मुंबईत त्यामुळे बाधितांचे प्रमाण वाढल्याचे भीषण वास्तव समोर आले.

नागपूरमधील  मेडिकल रुग्णालयात उपचार घेणाऱ्या करोनाग्रस्ताने दाखल होताना तो करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याचे लपवल्यामुळे विलगीकरणात जाणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांपासून मदतनीसापर्यंतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या १८ वर पोहचली आहे. या रुग्णाच्या चुकीने आरोग्य कर्मचारी कमी झाल्याने रुग्णालय व्यवस्थापनावर ताण वाढला आहे. विलगीकरणात जावे लागणाऱ्यांमध्ये ५ निवासी डॉक्टर, १ मुख्य वैद्यकीय अधिकारी, १ अधिव्याख्याता, ८ परिचारिका, २ मदतनीस, १ ईसीजी तंत्रज्ञाचा समावेश आहे. रुग्णालयातील आठपैकी दोन परिचारिकांना लहान मुले आहेत. दोघांनी सोमवारपासून त्यांच्या मुलांना बघितले नाही. त्यामुळे दोघांना रडू आवरत नाही. या बेजबाबदार रुग्णाला उपचारात मदतीसाठी मेडिकलमध्ये कार्यरत एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने सेवेवरील डॉक्टरांना सूचना दिल्याची चर्चा डॉक्टरांमध्ये आहे.

 ठाण्यातील रुग्णालय बंद

ठाण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये एक रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. १८ ते २३ मार्चपर्यंत तो रुग्णालयात उपचार घेत होता. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले. मात्र, प्रकृती पुन्हा बिघडल्याने तो मुलूंडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. तिथे त्याला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर त्याने ठाण्यातील ज्या रुग्णालयात उपचार घेतले. त्या रुग्णालयातील ३३ कर्मचारी आणि उपचार घेत असलेल्या ९ रुग्णांची आता तपासणी होईल. नालासोपारा येथील एका ५६ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती जसलोक रुग्णालयात कार्यरत होती. रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना करोनाची लागण झाली आहे, अशी माहिती समोर आली

महिलेमुळे रुग्णालयाची तपासणी..

घाटकोपर येथील ८६ वर्षीय महिलेचा करोना संसर्गामुळे हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मुलुंडमधील स्पंदन रुग्णालयात या आधी ती दाखल असल्याने रुग्णालय १४ दिवसांसाठी क्वारंटाईन के ले आहे.  रुग्णालयातील ६१ जणांच्या चाचण्या केल्या असून त्या नकारात्मक आल्या आहेत.

बालरोगतज्ज्ञाची बेफिकिरी.. नवीन पनवेल वसाहतीमधील एका बालरोगतज्ज्ञाने स्वत:च्या मुलीच्या परदेश प्रवासाची माहिती लपवून मागील १५ दिवसांत ४०० हून अधिक बालकांवर उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामुळे पनवेल पालिकेने संबंधित डॉक्टरच्या रुग्णालयातील बाह्य़रुग्ण तपासणीची सेवा तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात ३०२ बाधित

राज्यात एकूण ८२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली आहे. करोना निदानासाठी प्रयोगशाळांचे जाळे विस्तारण्यात आले असून आयसीएमआरच्या अनुमतीने सध्या राज्यात १० शासकीय आणि १३ खाजगी अशा एकूण २३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी सिध्द झाल्या आहेत. यातील खाजगी प्रयोगशाळांकडील अहवालांचे मूल्यमापन करुन त्यानंतर त्यांचे अहवाल अंतिम करण्यात येत आहेत.

देशातील रुग्णसंख्या १४९८

देशातील करोनाबळींची संख्या मंगळवारी ४५ झाली. करोनाचा संसर्ग झालेल्यांनी १४९८चा आकडा गाठला असून यात ४९ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर, करोनाची लागण झालेल्यांपैकी १२६ लोक आतापर्यंत बरे झाले आहेत.

पालघरमध्ये पहिला मृत्यू :  पालघर तालुक्यातील सफाळे उसरणी येथे वास्तव्य करणाऱ्या एका ५० वर्षीय नागरिकाचा विषाणूमुळे मृत्यू झाला. या व्यक्तीला गेल्या तीन दिवसांपासून पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात देखरेखीसाठी आणि उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

जगातील बळी ३८ हजारांपार

जगभरात करोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या मंगळवारी ३८ हजार ४६६ इतकी झाली.  इटलीमध्ये ११,५९१ लोकांचा मृत्यू झाला असून १,०१,७३९ लोकांना करोनाची लागण झाली आहे. स्पेनमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल ८४९ बळी गेल्यामुळे त्या देशातील बळींची संख्या ८ हजार १८९ झाली आहे, तर तेथील ९४,४१७ लोक करोनाबाधित आहेत.