चत्र महिन्यात उन्हाचा पारा चढल्याने नागरिक बेचन होतात. परंतु यंदा याच महिन्यात दिवसा उकाडा, रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी आणि त्यानंतर गारवा, असे विचित्र हवामान जिल्ह्य़ात आहे. यामुळे रुग्णसंख्येतही दररोज वाढ होत आहे.
यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट अधूनमधून नेहमीच होत गेली. त्यानंतर चत्र महिन्याला प्रारंभ होताच दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली. तापमानाने ४० अंशांपर्यंत झेप घेतली. मात्र पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. चारपाच दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामध्ये तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा  व परिसरातील शेतीपंपास वीजपुरवठा करणारे २७ खांब उन्मळून पडले. तर अनेकांच्या पत्र्याचे शेड मोडून पडले.
 मागील आठवडय़ात जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसाने उन्हाचा पारा जरासा खाली आला. परंतु उष्णतेत कमालीची वाढ झाली. दिवसा उन्हाची तीव्रता वाढण्यामुळे उकाडय़ाचा त्रास नागरिकांना होत आहे. सायंकाळ होताच ढग अचानकपणे भरून येत अवकाळी पावसाला सुरुवात होत असून, पाऊस पडून गेल्यानंतर रात्रीच्या सुमारास हिवाळ्याप्रमाणे गारवा जाणवत आहे. त्यामुळे वेगळेच वातावरण सध्याच्या स्थितीत पाहावयास मिळत असून थंडी, तापासह खोकल्याच्या साथीमुळे लहान बालकांसह ज्येष्ठ नागरिक मोठय़ा संख्येने त्रस्त आहेत. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
अवकाळी पावसानंतर शुक्रवारी ३९ अंशावर असलेले तापमान शनिवारी ४०.५ इतके नोंदविले गेले. तापमानाने चाळिशी गाठल्याने उष्णतेत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. रखरखत्या उन्हात घराबाहेर पडण्याचे आबालवृद्ध टाळू लागले आहेत. त्यामुळे दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत शहरातील रस्त्यांवर वर्दळही कमीच जाणवत आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे खूपच गरजेचे असेल तर घराबाहेर पडावे. शक्यतो उन्हाच्या वेळी घराबाहेर पडू नये. भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. पाणी पिताना काळजी घ्यावी, शक्यतो पांढरेशुभ्र कपडे परिधान करावेत. लहान बालकांना घराबाहेर पडू देऊ नये. उन्हामुळे नाकातून रक्त येण्याची शक्यता अधिक असते.
– डॉ. सचिन देशमुख, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक