मागच्या दोनतीन दिवसांत पुन्हा एकदा वातावरणात बदल झाल्यानंतर शनिवारी नगर शहर व परिसरात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शहरात दिवसभर ढगाळ हवामान होते. जिल्ह्य़ातही काही ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला. राहुरी फॅक्टरी परिसरात काही ठिकाणी गारपीटही झाली. कोपरगाव तालुक्यातही जोरदार पाऊस झाला.
या महिनाभरात तिस-यांदा अवकाळी पाऊस व गारपिटीचा फेरा आहे. त्याचे हे सलग तिसरे वर्ष असून सातत्याने होणारा अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पहिल्या ठिकाणच्या नुकसानीचे पंचनामे होईपर्यंत दुस-या ठिकाणी तडाखा बसतो आहे. यातील सातत्य लक्षात घेता यापुढे नुकसानभरपाईलाही मर्यादा येण्याची भीती व्यक्त होते. त्यामुळेच शेतकरी चिंताग्रस्त आहे.
गुरुवार व शुक्रवारी पारनेर तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. त्यात दोघांना जीवही गमवावा लागला. या दोन दिवसांत शेतीचेही मोठे नुकसान झाले असून, जिल्ह्य़ात अजूनही काही दिवस हेच वातावरण टिकून राहण्याची शक्यता व्यक्त होते. त्यामुळेच शेतकरी धास्तावले आहेत. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास राहुरी फॅक्टरी भागात गारपिटीचा तडाखा बसला.
नगर शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शनिवारीही सकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केली होती. त्यामुळे हवेतील उष्णता आणखी वाढली होती. दुपारी चारच्या सुमारास शहर व परिसरात काही वेळ पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतरही ढगाळ हवामान कायम होते.