रवींद्र जुनारकर

करोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता ओडिशात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ले न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हालचाली सुरूच आहेत. नक्षलवाद्यांनी नुकतेच खबऱ्या असल्याच्या संशयावरून माजी उपसरपंचाची हत्या केल्याने गडचिरोली पोलीस दलानेही जंगलात नक्षल विरोधी अभियान सुरूच ठेवले आहे.

टाळेबंदीत एका जिल्हय़ातूनच नाही तर एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासही बंदी आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच वाहतूक सुरू आहे. जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही कामे सुरू आहेत. ग्रामीण  लोकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यात कुठल्याही प्रकारची अडचण किंवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ओडिशात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ले न करण्याचा निर्णय घेतला आहे. एकप्रकारे नक्षलवाद्यांनी शस्त्रसंधी केली आहे. नक्षलवाद्यांच्या मलकनगिरी-कोरोपुट विशाखा विभागीय समितीचा सचिव कैलास याने प्रसार माध्यमांना रविवारी दिलेल्या ध्वनीफितीत सरकारी कर्मचाऱ्यांनी भीती न बाळगता  सुविधा पुरवाव्यात म्हणून शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. परंतु गडचिरोली जिल्हय़ात अगदी याउलट परिस्थिती आहे. गडचिरोलीत टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर लगेच २९ मार्च रोजी कोरची तालुक्यातील नवेझरी येथे माजी उपसरपंच हिरालाल कल्लो याची पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली. याचाच अर्थ  टाळेबंदीतही नक्षलवादी सक्रिय आहेत. म्हणूनच  गडचिरोली पोलीस दलानेही जंगलात नक्षलविरोधी अभियान सुरूच ठेवले आहे.

गडचिरोलीत नक्षलविरोधी अभियान सुरूच आहे. ओडिशा येथे नक्षल्यांनी शस्त्रसंधी केल्याचे वाचनात आले आहे. परंतु गडचिरोलीतील परिस्थिती वेगळी आहे. येथे नक्षल्यांनी अशा प्रकारचे कुठलेही पत्रक काढले नाही किंवा तसे आवाहनही केले नाही. त्यामुळेच अभियान सुरू आहे.

– शैलेश बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक , गडचिरोली