बलात्कार प्रकरणाचा तातडीने तपास करून १०० दिवसांत त्याला फाशी होईल, असा प्रस्ताव तयार करण्यात येत असून जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात तो राज्य सरकारला सादर केला जाईल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

वर्धा दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयास भेट दिली. या वेळी ज्येष्ठ नेते प्रा. सुरेश देशमुख उपस्थित होते.

बलात्काऱ्यांना दहशत बसावी म्हणून कठोर उपाय आवश्यक आहे. हे उपाय कसे असावे यासाठी अभ्यास सुरू आहे. त्याचा आराखडा तयार करून तो सरकारला सादर करण्याची भूमिका असल्याचे त्या म्हणाल्या. राज्याची तिजोरी रिकामी आहे. म्हणून त्यावर श्वेतपत्रिका काढून गत पाच वर्षांत तत्कालीन सरकारने काय केले याचा लेखाजोखा जनतेपुढे मांडण्याचा विचार आहे.

या निवडणुकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मोठा संघर्ष केला. त्यांना कधी नव्हे एवढा तरुणाईचा प्रतिसाद मिळाला. तसेच पक्षाच्या पडत्या काळात साथ देणाऱ्यांची चांगली दखल घेतली जाणार आहे. विदर्भात पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे ठरले आहे. येत्या तीन महिन्यांत पूर्व व पश्चिम विदर्भात निवासी प्रशिक्षण शिबिरे कार्यकर्त्यांसाठी आयोजित केले जाईल. पूर्व विदर्भातील शिबिर सेवाग्रामात घ्यावे. शेतकरी व कष्टकऱ्यांचा पक्षावर विश्वास आहे. त्यांची मते जाणून घ्या. त्यांच्या संपर्कात असावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.