वसई : शहरातील करोना केंद्रातील रुग्णांना वेळेवर जेवण आणि न्याहरी मिळावी यासाठी पालिकेने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून पालिकेचे ६ अधिकारी आणि कर्मचारी या कामासाठी तैनात करण्यात आले आहेत. पालिकेच्या या यंत्रणेमुळे रुग्णांना वेळेवर मोफत जेवण मिळू लागले आहे.

वसई-विरार महापालिकेने करोना रुग्णांवर उपचारासाठी करोना केंद्रे तयार केली आहेत. त्याशिवाय रिद्धिविनायक रुग्णालय अधिग्रहित करून त्यात गंभीर आजारी रुग्णांवर उपचार केले जातात. पालिकेचे वसईतील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय, वरुण इंडस्ट्रीज, कौल सिटी, म्हाडा कॉलनी, शिरगाव मधील विवा महाविद्यालय येथे करोना उपचार केंद्रे आणि अलगीकरण केंद्रे आहेत.

येथील रुग्णांना जीवदानी मंदिर ट्रस्ट मार्फत दररोज दोन वेळचे जेवण आणि न्याहरी मोफत पुरवली जाते. ट्रस्टतर्फे तयार करण्यात आलेले जेवण पालिकेच्या कर्मचाऱ्यामार्फत केंद्रात पुरवले जात होते. मात्र त्यात समन्वय नसल्याने रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नव्हते. यासाठी पालिकेने नगररचनाकार वाय.एस. रेड्डी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच पालिकेचे सहा कर्मचारी प्रत्यक्ष जेवण आणणे आणि पोहोचविण्याच्या कामावर तैनात करण्यात आले आहेत. पालिकेचे एकूण ७ टेम्पो असून ते दररोज विरारमधून जेवण आणून केंद्रावर पोहोचवत असतात. सकाळी साडेआठ वाजता न्याहरी, दुपारी १२ वाजता जेवण आणि संध्याकाळी ६ पर्यंत रात्रीचे जेवण पोहोचवले जाते.

जेवण वेळेत आणून ते रुग्णांपर्यंत पोहोचले की नाही याची जबाबदारी नोडल अधिकाऱ्यांची आहे. त्याचा ते दररोज आढावा घेत असतात. त्यामुळे आता रुग्णांच्या जेवणाबाबत तक्रारी नसल्याचे पालिकेने सांगितले.

दररोज दोन ते अडीच हजार रुग्णांना मोफत जेवण दिले जाते. पालिकेने यंत्रणा उभारल्यापासून रुग्णांच्या कुठल्याही तक्रारी येत नाही. आदल्या दिवशी करोना केंद्रातून येणाऱ्या मागणीनुसार हे जेवण पुरवले जाते, अशी माहिती नोडल अधिकारी वाय. एस. रेड्डी यांनी दिली.