गंगापूर पंचायत समितीतील विस्तार अधिकारी लक्ष्मण जीवन गव्हाणे यास ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी अटक केली. रांजणगाव नरहरी येथील सरपंचांना अतिक्रमण काढून घेण्याची सूचना जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली होती. त्याचे पालन न केल्याने दिलेल्या नोटिशीचा खुलासा मान्य करून घेण्यासाठी लाच मागितली होती.
नरहरी रांजणगाव येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारे अतिक्रमण काढले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. या प्रकरणी गंगापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले होते. या आदेशानुसार रांजणगावच्या सरपंचांनी अतिक्रमण का काढले नाही, अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली. त्याचा खुलासा सरपंचांनी करावा, असे सांगण्यात आले. सरपंचांनी नोटिशीला उत्तर दिले. हे उत्तर औरंगाबाद जि. प. येथे पाठविले असून, तेथील साहेबांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे प्रकरण मिटवून देतो म्हणून विस्तार अधिकारी गव्हाणे याने पाच हजार रुपयांची लाच मागितली. दुपारी सव्वादोन वाजता लाच स्वीकारताना गव्हाणे यास अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी ही कारवाई केली.