खासदार उदयनराजे भोसले यांची सत्ता असलेल्या सातारा पालिकेतील बांधकाम सभापतींनी वेळेत कामे होत नसल्याने मुख्याधिकारी व ठेकेदारास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पालिका प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी सूचना खासदार उदयनराजे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना केली आहे.

प्रभागात कामे होत नसल्याने भाजपा नगरसेविका आणि सातारा पालिकेच्या बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी मुख्याधिकारी आणि ठेकेदार यांना अपशब्द वापरत गळा चिरून टाकेन असे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप साताऱ्यात सध्या तुफान व्हायरल होत आहे.

BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
Alibaug, Rahul Narvekar
अलिबागचे नामकरण करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार दाखल
Why did Congress state president Nana Patole reject the candidacy of MP
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदारकीची उमेदवारी का नाकारली?

यावर बोलताना सिद्धी पवार म्हणाल्या की, “एक सातारकर म्हणून हा माझ्या भावनांचा उद्रेक आहे. लोकांची विकासकामे होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला मला सामोरे जावे लागत असल्याने मला संताप अनावरण झाला असून, लोकांच्या भावनांचा उद्रेक झालेला असल्याने, मला माझ्या वक्तव्याचा अजिबात खेद नाही.”
सातारा शहर प्रभागातील शिवशाही अपार्टमेंटच्या भिंतीच्या कामावरून सातारा पालिकेच्या बांधकाम सभापती आणि भाजपा नगरसेविका सिद्धी पवार यांनी फोनवरून ठेकेदाराच्या कामगारास चांगले फैलावर घेतले आहे. तसेच, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना शिवीगाळ केल्याच्या ऑडिओक्लिपची सध्या साताऱ्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

पालिकेच्या चाललेल्या कारभाराबाबत उदयनराजेंनी व्यक्त केली नाराजी –
या प्रकाराबाबत बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले की, “प्रत्येकाने जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे. काम करत असताना अडचणी निर्माण होत असतात, मात्र यामुळे समतोल बिघडता कामा नये. ऑडिओ क्लिप कशामुळे झाली मला माहिती नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मात्र अशी वक्तव्य करणे लोकप्रतिनिधी म्हणून मला अनपेक्षित आहे.” तसेच, उदयनराजे यांनी पालिकेच्या चाललेल्या कारभाराबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. या क्‍लिपची गंभीर दखल घेत त्यांनी विकास कामांत अडथळा ‍आणणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्‍याचा गुन्‍हा दाखल करण्‍याच्‍या सूचना पालिका प्रशासनास दिल्‍या आहेत.

नगरसेवक कोणत्‍याही पक्षाचा असू द्या, पण असे प्रकार चुकीचे – उदयनराजे
“कोणाला शिवीगाळ करणे, अर्वाच्‍च भाषेत दम देणे, जीवे मारण्‍याची धमकी देणे चुकीचे आहे. नगरसेवक कोणत्‍याही पक्षाचा असू द्यात. पण, असे प्रकार चुकीचे आहेत. शासकीय कामात अडथळा आणल्‍यास विकासकामे रखडतील. यामुळे मी अभिजीत बापट यांना अशा कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्‍हा नोंद करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत.” असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.

क्‍लिप व्‍हायरल करणार्‍यांना मी धन्‍यवाद देते; लोकहितासाठी कितीही गुन्‍हे दाखल झाले तरी फरक पडणार नाही – सिद्धी पवार
तर, आपण केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना भाजपा नगरसेविका आणि सातारा पालिकेच्या सभापती सिद्धी पवार यांनी सांगितले की, “सातारकरांच्‍या भावना मी व्‍यक्‍त केल्‍या असून सुरू असणार्‍या कामाचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. माझे ते संभाषण एक तारखेचे आहे. ते व्‍हायरल केल्‍याने नागरिकांना माझ्‍या कामाची पध्‍दत आणि त्‍यांच्‍याविषयी असणारा कळवळा दिसून येतो. क्‍लिप व्‍हायरल करणार्‍यांना मी धन्‍यवाद देत असुन लोकहितासाठी कितीही गुन्‍हे दाखल झाले तरी त्‍याचा काहीही फरक पडणार नाही. मी जे बोलले ते भावनेच्‍या भरात आणि नागरिकांच्‍या प्रेमापोटी बोलले आहे. माझी भाषा आक्रमक आहे आणि ती मला मान्‍य आहे.”

काम चार वर्षे रखडवले त्‍यांच्‍यावर का गुन्‍हा दाखल होत नाही? –
तसेच, “लोक मला कामाबाबत विचारतात. नेत्‍यांनी माझ्‍यावर गुन्‍हा दाखल करायला सांगितले आहे. त्‍यांचा प्रत्‍येक शब्‍द मी मानते. माझे बोलणे गुन्‍हा असेल तर काम चार वर्षे रखडवले त्‍यांच्‍यावर का गुन्‍हा दाखल होत नाही? कशाची वाट बघताय? असा सवालही सिद्धी पवार यांनी यावेळी उपस्‍थित केला. मी मुग गिळून गप्‍प बसणार नाही, मी नागरिकांच्‍या प्रश्‍नांवर बोलणारच.” असेही सिद्धी पवार यांनी स्पष्ट केले.