आकाशवाणी केंद्रातील एका अधिकाऱ्याकडून महिला सहकाऱ्यासाठी भर बैठकीत अश्लील शेरेबाजी झाल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दीडशे कर्मचारी व अधिकारी असलेल्या केंद्रात सध्या जो गोंधळ सुरू आहे ते बघता या केंद्रावर नियंत्रण तरी कुणाचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्राची स्थापना व्हायच्या आधीच या मराठी मुलखात सुरू झालेले पहिले प्रक्षेपण केंद्र अशी येथील आकाशवाणीची ओळख आहे. शांता आपटे, प्रभा अत्रे अशा नामवंतांचा पदस्पर्श लाभलेल्या या केंद्रात सध्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची जातीनिहाय विभागणी झाली आहे.
या विभागणीतून निर्माण झालेले गट मग प्रतिस्पर्धी गटातील व्यक्तींना त्रास देतात. त्यांच्या तक्रारी करणे, भांडणे, खोटय़ा गुन्ह्य़ात अडकवण्याची धमकी देणे असे प्रकार सर्रास या केंद्रात सुरू आहेत. या जातीनिहाय वर्गवारीचा सर्वात मोठा फटका येथील महिला कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. अश्लील शेरेबाजीमुळे कंटाळलेल्या या महिलांनी केंद्रप्रमुखाकडे प्रारंभी तक्रार केली तेव्हा त्यांना लेखी तक्रार करा व अश्लील शेरेबाजी केल्याचा पुरावा आणा, असे सांगण्यात आले. कार्यक्रम अधिकारी असलेल्या एका महिलेला १५ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत अमर रामटेके या अधिकाऱ्याने अश्लील शब्द वापरत शेरेबाजी केली. केंद्रप्रमुख चंद्रमणी बेसकर यांच्या समक्ष हा प्रकार घडला. या महिलेने या शेरेबाजीचे ध्वनीमुद्रण केले व पुराव्यासह त्याच दिवशी वरिष्ठांकडे तक्रार केली. या तक्रारीची प्रत केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकरांकडे सुद्धा पाठवण्यात आली. आता दोन महिने होत आले तरी अजून या शेरेबाज अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही.
चौकशी सुरू आहे असेच या तक्रारकर्त्यां महिलेला सांगण्यात येत आहे. अमर रामटेके यांच्या अश्लील बोलण्याचा त्रास केवळ याच महिलेला आहे असे नाही. या केंद्रातील इतर महिला व पुरुष कर्मचारी सुद्धा या रामटेकेंच्या विचित्र वर्तनामुळे त्रस्त आहेत. रामटेकेंच्या बेताल बडबडीची एक सीडीच या कर्मचाऱ्यांनी तयार केली. ही सीडी तक्रारीसह वरिष्ठांना पाठवण्यात आली. आकाशवाणीच्या महासंचालकांकडे देण्यात आली, पण चौकशी पलिकडे काहीच झाले नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांविषयी अवमानकारक बोलणे, जातीवरून शिवीगाळ करणे, महिलांना मलमूत्र पाजण्याची धमकी देणे अशी अनेक आक्षेपार्ह वाक्ये या सीडीत आहेत. या केंद्रात केवळ महिलांचाच अपमान होतो असे नाही तर प्रक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमात सुद्धा अश्लीलतेची रेलचेल असते. एकेकाळी बालविहार, युवाजगत सारखे लोकप्रिय कार्यक्रम श्रोत्यांना देणाऱ्या या केंद्राचा दर्जा पार रसातळाला गेला आहे.
या केंद्रावरून ‘कामगार सभा’ हा कार्यक्रम प्रक्षेपित होतो. केवळ कामगारांसाठी असलेल्या या कार्यक्रमात गेल्या २० सप्टेंबरला झाडीपट्टी रंगभूमीवर अश्लील डान्स करणाऱ्या एका नर्तकीची मुलाखत घेण्यात आली. त्यात ‘तू तर गोपी आहे’ असे शब्द वापरण्यात आले. या नर्तकीला झाडीपट्टीची ‘ड्रिमगर्ल’ असे संबोधन देण्यात आले. वास्तविक कामगारांचा व या रंगभूमीचा काही एक संबंध नाही. तरीही हा प्रकार करण्यात आला. या प्रकरणाची तक्रार सुद्धा झाली, पण अजून कुणावर कारवाई झालेली नाही.
(पूर्वार्ध)

प्रकरण मिटले – बेसेकर
अश्लील शेरेबाजीच्यासंदर्भात तक्रार आल्यानंतर उच्चस्तरावर चौकशी करण्यात आली. कार्यक्रम अधिकारी रामटेके यांना सक्त ताकीद दिल्यानंतर प्रकरण मिटवण्यात आले, असे केंद्रप्रमुख चंद्रमणी बेसेकर यांनी सांगितले. तर तक्रारकर्त्यां महिलेने प्रकरण मिटलेले नाही व कोणताही समझोता झालेला नाही असे आज सांगितले. या तक्रारीनंतर आकाशवाणीत महिला तक्रारनिवारण कक्षाची स्थापना करण्यात आली, असे त्या म्हणाल्या.
शेरेबाजी केली नाही – रामटेके
कोणत्याही बैठकीत मी महिलांना अश्लील शेरेबाजी केली नाही. या केंद्रात गेल्या २० वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या काही कर्मचाऱ्यांनी माझ्याविरुद्ध खोटय़ा तक्रारी करणे सुरू केले आहे, असे कार्यक्रम अधिकारी अमर रामटेके यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.