कोकणातील पाच जिल्ह्य़ांमध्ये अधिकारी शाळांचे मूल्यांकन करणार

जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ांमध्ये एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. जिल्ह्य़ातील सर्व विभागातील अधिकारी हे जिल्हा परिषदांच्या शाळेत जाऊन परिस्थितीचे मूल्यांकन करणार आहेत.

शाळेतील भौतिक आणि शैक्षणिक समस्या, त्रुटी, अडचणी यांचा अहवाल तयार करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात सहभागी होणारे सर्व अधिकारी विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकातील एक धडा शिकवणार आहेत. जिल्हा परिषदांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळांचे भौतिक आणि शैक्षणिक मूल्यांकन केले जाणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनातील वर्ग १ आणि वर्ग २ चे अधिकारी शाळेत जाऊन तेथील परिस्थितीचा सर्वसमावेश आढावा घेणार आहे. शाळेतील पटसंख्या, विद्यार्थ्यांची उपस्थिती, मंजूर शिक्षक, कार्यरत शिक्षक, शाळेत उपलब्ध भौतिक आणि शैक्षणिक सुविधा आणि त्यांची परिस्थिती, शाळेतील स्वच्छता, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, शालेय पोषण आहार, ई- लìनग, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि शिक्षकांचा शिकवण्याचा दर्जा यासर्व घटकांबाबतचे मूल्यांकन या अधिकाऱ्यांमार्फत केले जाणार आहे.

प्रत्येक शाळेसाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना दुर्गम भागातील शाळांची जबाबदारी सोपवली जाणार आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संयुक्तपणे प्रत्येक अधिकाऱ्यावर एका शाळेची जबाबदारी सोपवणार आहेत. ७ जुल, २१ जुल आणि १८ ऑगस्ट या तीन दिवसांत एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे.

एक दिवस शाळेसाठी या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणीसाठी दोन समित्या जिल्हा स्तरावर गठित करण्यात आल्या आहेत. यामधील नियामक समितीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असणार आहेत. सदस्य म्हणून उपाध्यक्ष व जिपच्या विषय समित्यांचे सभापती, पंचायत समित्याचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशित केलेले अधिकारी व सदस्य सचिव म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचा समावेश असणार आहे, तर कार्यकारिणी समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे अध्यक्ष असून, शिक्षणाधिकारी सहअध्यक्ष असणार आहे. या समितीत जिल्हा परिषदेतील सर्व खाते प्रमुख, सर्व गटशिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत.

शालेय गुणवत्ता सुधारण्यासाठी समाजाचा सहभाग करून घेणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेबाबत आस्था निर्माण करणे, विद्यार्थ्यांनी आदर्श व्यक्तिमत्त्वाचे अनुकरण करणे, समाजातील सर्व घटकांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे, शाळांमधील उल्लेखनीय बाबी व गरजा यांची जाणीव करून देणे, पालकांना गुणवत्ता पूर्ण शिक्षणाची हमी देणे, शाळा भेटीतून बालकांशी समरस होऊन बाल आनंद लुटणे अशी या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत. रायगड जिल्ह्य़ात २८०० प्राथमिक शाळा आहेत. या शाळांना ६०० अधिकारी दर महिन्याला १ प्रमाणे भेट देतील. प्रत्येकावर तीन शाळांची जबाबदारी असेल. त्यांचा नियमित आढावा घेतला जाईल.

‘विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार तीन हा उपक्रम जिल्ह्य़ातील शाळांमध्ये राबविला जाणार आहे. सर्व अधिकाऱ्यांना शाळांचे मूल्यांकन कसे करावे याबाबत बठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्य़तील सर्व वर्ग १ आणि वर्ग २ चे अधिकारी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. कोणाला शिक्षा करणे हा या उपक्रमाचा उद्देश असणार नाही’ असे रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी सांगतले.

‘शैक्षणिक गुणवत्ता वाढावी आणि शिक्षण कोठे मागे राहतेय याचा ऊहापोह व्हावा हा या उपक्रमामागचा मूळ उद्देश आहे. या उपक्रमात सहभागी होणारे अधिकारी शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीचा आढावा घेतील, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठय़पुस्तकातील एक धडाही शिकवतील,’ असे रायगडचे शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांनी सांगितले.