भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नगरसेविकेच्या पतीचा समावेश

भाईंदर : तौक्ते चक्रीवादळामुळे खचलेल्या धोकादायक इमारतीला भुईसपाट करण्याकरिता गेलेल्या अधिकाऱ्यांना इमारतीमधील रहिवाशांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकूण पाच रहिवाशांविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्ह्यची नोंद करण्यात आली  असून त्यातील एक आरोपी हा नगरसेविकेचा पती असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मंगळवारी आलेल्या तौक्ते चाक्रीवादळाचा मीरा-भाईंदर शहराला गंभीर प्रमाणात फटका बसला. यात सकाळी सहाच्या सुमारास सुरू असलेल्या सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे भाईंदर पश्चिम परिसरातील सोनम को-ऑपरेटिव्ह इमारत कोसळल्याची घटना घडली. घटनास्थळी तात्काळ अग्निशमन यंत्रणा पोहोचून ७२ लोकांची सुखरूप सुटका करण्यात प्रशासनाला यश प्राप्त झाले. मात्र इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती असल्यामुळे ती तात्काळ पाडण्याचे आदेश आयुक्त दिलीप ढोले यांनी दिले होते.

त्याअनुषंगाने इमारत पाडण्याचे काम सुरू असताना इमारतीमधील रहिवाशांनी पालिका अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घालण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे चार तरुणांनी चक्क पालिकेचे अतिक्रमण अधिकारी नरेंद्र चव्हाण यांस मारहाण केली. त्यामुळे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हर्ष शाह, आर्यन शाह, मित शाह, उन्मेष शाह आणि सतीश भुक्तानी अशा पाच जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सतीश भुक्तानी हे स्थानिक भाजप नगरसेविकेचे पती आहेत.