सर्व पातळय़ांवर निरंकुश सत्ता असूनही सत्ताधारी असल्याचा अनुभव न मिळणाऱ्या पदाधिकाऱ्यांची उंबरठय़ावर आलेली अस्वस्थता जिल्हा भाजपमध्ये निरव शांतता निर्माण करणारी ठरत आहे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पालिका, पंचायती सत्ता अशा सत्तास्थानामुळे जिल्हा भाजपमय व काँग्रेसमुक्त झालेला आहे. पण तरीही सत्ता आपली आहे, याची चव न मिळणारे असंख्य प्रमाणात आहेत. पक्षात नव्याने आलेले व पक्षासाठी खस्ता खाल्लेले असे दोन्ही गट अस्वस्थ असल्याची स्थिती म्हणजे सर्व आलबेल नसल्याचेच द्योतक ठरावे. सत्ता ही पक्षामुळे मिळाल्याची वारंवार शिकवणी मिळते. त्यामुळे व्यक्ती नव्हे तर पक्ष मोठा असा आदर्श असणाऱ्या भाजपात सत्तेची सूत्रे लोकप्रतिनिधीऐवजी संघटनेच्या सूत्रधारांकडेच आहेत.

खासदार व आमदारांनी काय करावे, निधी कुठे खर्ची करावा, कोणते कार्यक्रम घ्यावे याची वारंवार होणारी उजळणी या नेत्यांना जमिनीवर पाय ठेवण्यास भाग पाडते. परिणामी बडय़ा नेत्यांच्या अनुयायांनाही गप्प करते. नेता म्हणेल ती पूर्व दिशा असा काँग्रसी असतांना आलेला अनुभव आता कोसो दूर आहे. त्यातच सूत्रधारांचे राजकीय डावपेच पुढील निवडणुका डोळय़ापुढे ठेवत चालले आहेत. पक्षासाठी खस्ता खाल्या म्हणून आता  ‘खाऊ’ दय़ा अशी विनंती अमान्य होते. साधा प्रसादही मिळणे कठीण झाले आहे. लोकप्रतिनिधी होऊ न शकणाऱ्यांची कामे करण्याची हौस जागेवरच विरते. पुढील काळासाठी सक्षम कोण ठरणार, याचा शोध सुरू झाला आहे.

भाजपला देवळी व आर्वी मतदारसंघात साथ मिळालेली नाही. माजी आमदार दादाराव केचे यांना वृध्दाश्रमात पाठविण्याचा निर्णय पक्का झाल्याचे दाखले पुढे येत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू व पूर्तीचे सर्वेसर्वा सुधीर दिवे यांचा आर्वी मतदारसंघातील वाढता वावर केचेंसाठी सूचक इशारा आहे. विविध कार्यक्रमांनिशी दिवेंचा होणारा संपर्क त्यांना इच्छुकांच्या यादीत टाकतो. मुख्यमंत्र्यांचे स्विय सचिव सुमित वानखेडे हे मूळचे आर्वीकर आहेत. आर्वीत विविध योजना व कार्यक्रमांचा बिगुल फुंकण्यास त्यांनी भरलेली हवा कारणीभूत ठरली. म्हणूनही ते चर्चेत असले तरी कट्टर भाजप नेते त्यांना अनुकूल नाहीत. आमदार अमर काळेंनी मते कमी करण्यास केचे सक्षम राहलेले नाही. हे सूत्र पूढे आल्याचे नव्या गडय़ाचा शोध सुरू झाल्याची चर्चा होते.

देवळी- पुलगावच्या भाजपला पक्का गडी भेटलेला नाही. सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांच्या भाजप प्रदेशाची तयारी झाल्याचे व त्यांना पुढे त्याच देवळी मतदारसंघातून लढविण्याचे ठरल्याचे भाजपचे वरिष्ठ वर्तुळ बोलते. मात्र,  प्रा. देशमुख ही बाब सपशेल फेटाळतात. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपवासी होण्यास दिलेला नकार अद्याप कायम आहे. पण तरीही भाजप त्यांच्या वाटेवर आस लावून आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष हे सत्ताधारी की विरोधी पक्षाचे हे कोडे अद्याप सूटले नसल्याचे चित्र त्यांच्या वर्तनातून उमटते. तसेच नको त्या कारणांनी त्यांची चर्चा पक्षात होते. म्हणून देवळी- पुलगाववर संघटना पदाधिकाऱ्यांची विशेष नजर आहे.

इकडे पक्ष प्रवेशास साडेतीन वर्षे लोटूनही पदरात काहीच न पडल्याने दत्ता मेघेंचे वर्तूळ अस्वस्थ आहे. मूळात आपण पदासाठी भाजपप्रवेश केलाच नसल्याचे मेघे सांगतात. राजकारण करायचे तर तुम्हाला गारूडय़ासारखे डमरू वाजविणे क्रमप्राप्त ठरते. म्हणजेच लोकांना खिळवून ठेवणे अपेक्षित असते. असा दाखला कधीकाळी देणाऱ्या मेघेंजवळ आता संस्थेखेरीज लोकांना खेचणारे दुसरे चुंबक नाही. लोकांच्या गराडय़ात रमायला आवडणारे मेघे त्यांच्या विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे बिगुल अधुनमधून फुंकतात. पण त्यामुळेही आता फारसे लक्ष वेधल्या जात नसल्याचे दिसून येते. पण कोणत्याही पदावर नसतांना आजही भाजपमध्ये गर्दी खेचनारे ते एक बडे नेते आहेत. हे भाजपजन मान्य करतात. लोकप्रतिनिधींकडे न रमणारे सर्वच नेते मेघेंच्या सावलीत स्वत:ला धन्य मानतात. मेघेंचे पुढचे पाऊल काय, हा आता तरी उत्सुकतेचाच प्रश्न आहे.   आमदार समीर कुणावार व डॉ. पंकज भोयर या दोघांचे प्रभावक्षेत्र सीमितच आहे. त्यातच आमदार विरुध्द इतर असे ध्रुवीकरण आहेच. आमदार विरुध्द नगराध्यक्ष अशी गटबाजी लपून नाही.

या सर्वात ‘रंग माझा वेगळा’ म्हणून खासदार रामदास तडस यांची वाटचाल आहे. समाजाचे कवचकुंडल, प्रभावी जनसंपर्क, संघटना कारभाऱ्यांशी समन्वय व पोटातील पाणी हलू न देता कृती करण्यात पारंगत खासदार तडस सगळय़ांशीच जमणारे व कुणाशीच जवळीक नसणारे म्हणून पक्षात परिचित आहे.

आमदार बंटी भांगडिया यांची उमेदवारी यावेळी राहणार नाही. हे गृहीत धरून वर्धा-चंद्रपूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघावर अनेकांचा डोळा आहे. पक्षप्राबल्यामुळे हमखास विजय अपेक्षित असणाऱ्या या मतदारसंघात संघनिष्ठ नेत्यास उमेदवारी मिळण्याची चर्चा होते. भाजपमधील वेगाने पसरणाऱ्या अस्वस्थतेचे हे एक नवे कारण आहे. पक्षसेवेचे प्रमाणपत्र दाखवून पद मिळण्याची शाश्वती भाजपमध्ये राहिली नसल्याचे छातीठोकपणे सांगितले जाते. मुळात तुमची गरज नाही. असाच अनुभव घेणाऱ्या नेत्यांची संख्या पक्षात वाढत चालली आहे.