रत्नागिरी : तेलशुद्धीकरण प्रकल्पाला नाणारमध्ये होणारा विरोध लक्षात घेता रायगड जिल्ह्यातील तळे येथे हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या वतीने सौदी अरेबियाच्या ‘अराम्को’ कं पनीला देण्यात आला असतानाच, विदर्भात हा प्रकल्प उभारण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे के ल्याने हा प्रकल्प कोकण की विदर्भात होणार याची आता उत्सुकता असेल.

सौदी अरेबियाच्या अराम्को या आघाडीच्या तेल कंपनीच्या सहकार्याने राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात रिफायनरी उभारणीला होत असलेला विरोध लक्षात घेऊन राज्य शासनाने रायगड जिल्ह्यातील तळे येथे हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दिला असला, तरी कंपनीकडून या प्रस्तावाबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नसल्याने प्रकल्पाचे भवितव्य अजून अधांतरी आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन विदर्भात हा प्रकल्प उभारण्याची विनंती केल्यामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नाणार परिसरातील प्रकल्पासाठी प्रस्तावित असलेली चौदा गावांमधील काही जमीन मालक आणि राजापूर शहरातील प्रकल्प समर्थकांचा मोठा गट त्या भागात तेलशुद्धीकरण प्रकल्प व्हावा यासाठी अजूनही प्रयत्नशील आहे. मात्र स्थानिकांना नको असेल तर तेथे हा प्रकल्प होणार नाही, या भूमिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते ठाम आहेत. त्याचबरोबर, सुमारे तीन लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये, अशीही सत्ताधाऱ्यांची तीव्र इच्छा आहे. म्हणून आता याच तालुक्यात पर्यायी जागेचा शोध सुरू झाला असून त्या दृष्टीने राजापूर शहरानजिकच्या बारसू – सोलगांव या परिसरात चाचपणी सुरू असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. तशा आशयाच्या बातम्याही माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र त्यामध्ये फारसे तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे तालुक्यातील पर्यायी जागेमध्ये रिफायनरी उभारणीच्या समर्थनाचे मुद्दे हितसंबंधीयांकडून पुढे आणले जात असतानाच खुद्द उद्योगमंत्री देसाई यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी शासकीय पातळीवरून अशा काही हालचाली चालू नसल्याचे नमूद केले.

शिवसेनेचे स्थानिक खासदार विनायक राऊत यांनी देसाई यांच्या म्हणण्याला दुजोरा देताना सांगितले की, नाणार प्रकल्प होत नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बारसू-सोलगाव परिसरातील काही हितसंबंधी गट किंवा व्यक्ती अचानक सक्रिय झाल्या असून इतर काही जणांना हाताशी धरून अशा कंड्या पिकवल्या जात आहेत. पण ते सांगत असलेल्या सोलगाव आणि देवाचे गोठणे याही गावांच्या ग्रामपंचायतींनी प्रकल्पाच्या विरोधात ठराव मंजूर केले आहेत. त्यामुळे राजापूर तालुक्यात हा प्रकल्प होण्याची शक्यता जवळपास नाही. मात्र रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात तळे येथे कंपनीने हा प्रकल्प उभारावा, असा प्रस्ताव राज्य शासनाने कंपनीला दिला आहे. केंद्रीय रसायन व खते मंत्रालयालाही तसे कळवले आहे. जेएनपीटी बंदर आणि राष्ट्रीय महामार्ग तेथून जवळच असल्याने वाहतुकीची उत्तम सोय आहे. मात्र या प्रस्तावावर कंपनीकडून अजून काही प्रतिसाद आलेला नाही. बारसू-सोलगाव परिसरात प्रकल्पासाठी कंपनीला रस असेल तर तसे कंपनीने शासनाला अधिकृतपणे काहीही कळवलेले नाही. रायगड जिल्हा प्रशासनाकडे याबाबत चौकशी केली असता, मात्र काही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

विदर्भात तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारायचा झाल्यास त्याचा खर्च वाढेल. तेलशुद्धीकरण केंद्र हे समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असणे के व्हाही आर्थिकदृष्ट्या सोयीचे ठरते. विदर्भात प्रकल्प उभारल्यास तेल वाहून नेण्यासाठी मोठी वाहिनी (पाइपलाइन) टाकावी लागेल. त्यासाठी भूसंपादन व अन्य किचकट प्रक्रि या पार पाडावी लागेल.

प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी

सौदी अरेबियाच्या अराम्को या आघाडीच्या तेल कंपनीच्या सहकार्याने राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात रिफायनरी उभारणीला होत असलेला विरोध लक्षात घेऊन राज्य शासनाने रायगड जिल्ह्यातील तळे येथे हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दिला असला, तरी कंपनीकडून या प्रस्तावाबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नसल्याने प्रकल्पाचे भवितव्य अजून अधांतरी आहे.