कोकण किनारपट्टीवर मोठा धुमाकूळ घातलेल्या ‘निसग’ चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे येथील मिऱ्या समुद्रकिनारी लागलेले जहाज बंधाऱ्यावर आदळले असून त्यामधून काही प्रमाणात तेल गळती सुरू झाली आहे.

मात्र या प्रकारात कोणताही धोका नसून सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे बंदर विभागाकडून सांगण्यात आले .

दक्षिण आफ्रिकेहून शारजाला निघालेले हे जहाज गेल्या मंगळवारी रत्नागिरीच्या सागरी भागात असताना येऊ घातलेल्या चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला होता. या धोकादायक परिस्थितीत पुढे प्रवास करणे शक्य नव्हते. म्हणून जहाजाच्या कप्तानाने बंदर विभागाशी संपर्क करून आश्रय मागितला.  त्यानुसार येथील नर्मदा जेटीवर ते लावण्याची परवानगी देण्यात आली.  पण पाठोपाठ आलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्याने जहाजाचा  नांगर तुटून ते भरकटत मिऱ्या समुद्र किनारी लागले. समुद्राच्या लाटांचा सर्वात जास्त प्रभाव या भागातच असतो. त्यामुळे येथे सुमारे चार ते सहा मीटर उंचीच्या लाटा उसळतात.

या लाटांच्या तडाख्यात हे जहाज सापडले. त्यामुळे जहाजावरील १३ खलाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र त्यांना सुरक्षित उतरण्यात आले. हे सर्व परदेशी नागरिक असल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान शुक्रवारी दुसऱ्या दिवशी उधाणामुळे जहाज बंधाऱ्यावर आदळून त्याचे आणखी नुकसान झाले आहे आणि जहाजाच्या तेलाच्या टाकीला गळती लागली आहे. मात्र सध्या त्या जहाजाला धोका नाही. रत्नागिरीत यायला निघाले आहेत. त्यानंतर जहाज काढण्याबाबत निर्णय होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जहाजातील सुमारे २५ हजार लिटर डिझेल उतरवण्याच्या पर्यायाचाही विचार चालू आहे, असे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले यांनी सांगितले.