महाडच्या सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर, दिंडोरी-कळवण रस्त्यावरील अवनखेड नदीवरील जुना पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी बंद केला.

१४ मार्च १९९४ रोजी याच नदीवरील पुलाचे कथडे तोडून एसटी बस नदीत कोसळली होती. त्यात जवळपास ८९ प्रवासी मरण पावले होते. त्या नंतरच्या काळातही या पुलावर लहान-मोठे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला. या अरुंद जुन्या पुलालगत समांतर पूल बांधावा, अशी मागणी प्रदीर्घ काळापासून केली जात होती. बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर या रस्त्याचे काम दिले गेले. हे काम घेणाऱ्या कंपनीलाही नदीवर समांतर पूल बांधण्याची गरज वाटली नव्हती. दरम्यानच्या काळात काँग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अवनखेड नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. तीन महिन्यांपूर्वी काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर बांधकाम विभागाने या नव्या पुलाला लागून असलेल्या जुन्या पुलावरील वाहतूक बंद केल्याचे सांगितले जाते.

 

मार्गावर दगड-माती आल्याने कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत

प्रतिनिधी, रत्नागिरी ; कोकण रेल्वे मार्गावर उक्षी येथे दगड-माती वाहून आल्यामुळे गुरुवारी सकाळी सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली. सध्या कोकणात सर्वत्र पावसाचा जोर असून रस्ते किंवा रेल्वेमार्गालगतच्या डोंगरावरून मोठय़ा प्रमाणात पाण्याचे ओहोळ वाहत आहेत, तसेच या पाण्याबरोबर दगड-मातीही वाहून येत आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या उक्षी येथील रेल्वेमार्गावरील बोगद्याजवळ डोंगराला सुरक्षिततेचा उपाय म्हणून लावलेली जाळी तोडून अशाच प्रकारे दगड-माती वाहून आल्याचे तेथील ट्रॅकमॅनच्या लक्षात आले. त्याने ही माहिती नियंत्रण कक्षाला देताच मुंबईहून रत्नागिरीकडे येत असलेली कोकणकन्या एक्स्प्रेस संगमेश्वर स्थानकात थांबवण्यात आली, तर रत्नागिरी-दादर पॅसेंजरला येथील स्थानकातच थांबवून ठेवण्यात आले.  कोकण रेल्वेचे तंत्रज्ञ आणि मजुरांनी रेल्वेमार्गावर आलेली दगड-माती बाजूला करून तुटलेली जाळी दुरुस्त केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. पण त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाली. तसेच स्थनकांवरील उद्घोषणा यंत्रणेद्वारे प्रवाशांना या प्रकाराची काहीही कल्पना देण्यात न आल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.