मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जुना पूल वाहून गेल्यामुळे घटनास्थळी मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचारण (एनडीआरएफ) करण्यात आले आहे. या पूलावरून निघालेल्या दोन एसटी बसेस आणि सहा ते सात वाहने या दुर्घटनेनंतर बेपत्ता आहेत. पुराच्या पाण्यात ही वाहने वाहून गेली असून, त्यामध्ये ३० ते ३५ प्रवासी असण्याची शक्यता आहे. नेमका आकडा स्पष्ट झालेला नाही. एनडीआरएफची चार पथके घटनास्थळी दाखल झाले असून, त्यामध्ये २०० हून अधिक जवान आहेत. त्याचबरोबर नौदल आणि तटरक्षक दलालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे.
काय आहे वाहून गेलेल्या ‘महाड’ पूलाचा इतिहास?
मंगळवारी रात्रीच्यावेळी ही दुर्घटना घडली. प्राथमिक तपासात सावित्री नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा दाब पडल्यामुळे पूल कोसळला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला, अशी शक्यता वर्तविण्यात येते आहे. घटना घडली त्यावेळी पूलावर नेमकी किती वाहने होती, याची अधिकृत माहिती नाही. मुंबई-गोवा महामार्गावरून मंगळवारी रात्री प्रवास करीत असलेले जे प्रवासी घरी पोहोचले नाहीत. त्यांच्या कुटुंबियांनी ०२१४१ २२२११८ किंवा १०७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. रायगडचे जिल्हाधिकारी शितल उगले आणि पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.