लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नुकताच जाहीरनामा प्रकाशित केला. १९७२ सालच्या जाहीरनाम्यातीलच भाषा त्यामध्ये आहे. नवीन काही नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी खासदार गोविंदराव आदिक यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवनमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत आदिक बोलत होते. या वेळी वाकचौरे, आमदार भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, अप्पासाहेब कदम, बबनराव पवार, सुभाष कुलकर्णी, वसंत मनकर, संपत नेमाणे आदी उपस्थित होते.
आदिक म्हणाले, १९७२ साली मी आमदार होतो. त्या वेळी इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाव’चा नारा दिला. त्यांनी खूप काम केले, त्यामुळे देश पुढे गेला. पण दुर्दैवाने नंतरच्या काळात हे काम मागे पडले. इंडिया शायनिंग, राम मंदिर, भारत विरुद्घ इंडिया आदी अनेक नारे आले. असे असले तरी स्वातंत्र्यानंतर आजही दारिद्रय़ नष्ट झाले नाही. शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न कायम आहेत. बेरोजगारी वाढत आहे. अमेरिकेबरोबर स्पर्धा करायला देश निघाला असला तरी समृद्धीचे समान वाटप झालेले नाही, अशी टीका त्यांनी केली.
संयुक्त लोकशाही आघाडीच्या काळात देशात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. धान्य उत्पादन वाढले, विकास झाला, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे स्वभावाने चांगले आहेत. जनतेचे मित्र आहेत. त्यांना सर्वानी विजयी करावे, असे आवाहनही आदिकांनी केले.
या वेळी ससाणे, कांबळे, कदम, कुलकर्णी, पवार, एल. पी. थोरात, श्रीधर आदिक, सचिन गुजर आदींची भाषणे झाली.