भूक शमविण्यासाठी धडपडणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची व्यथा

‘पोटाला काही मिळत नाही. माती खायची का’, असं वैतागून म्हणताना आपण पाहतो. पण खायला अन्न मिळत नाही म्हणून एक वृध्द दाम्पत्य खरोखर कोळसा खाऊन भुकेचा आगडोंब शमवत असेल तर.? अंगावर शहारे आणणारे हे वास्तव सोलापुरात पाहावयास मिळाले आहे. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे या दुर्दैवी निराधार दाम्पत्याच्या नशिबी खरोखर कोळसा खाण्याचे भोग आले आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच काही सुहृदयी मंडळींनी मदतीचा हात पुढे करीत दाम्पत्याला आधार दिला आहे. तर इकडे प्रशासन यंत्रणाही जागी होऊन संजय गांधी निराधार योजनेचा लाभ सुरू केला आहे.

शहरातील विष्णू नगर या श्रमिकांच्या वस्तीत राहणाऱ्या तिमप्पा नागप्पा माचर्ला (वय ७७) आणि सौरम्मा (वय ६५) या निराधार वृद्ध दाम्पत्याची ही व्यथा. या दाम्पत्याला एकुलती एक मुलगी असून लग्न झाल्यानंतर ती सासरी गेलेली. वृध्द तिमप्पा हे पूर्वी एका चादर कारखान्यात कामावर जायचे. परंतु गेल्या दहा-बारा वर्षांपासून वृध्दत्वामुळे काम झेपेना म्हणून ते घरीच असतात. निराधार असल्याने दहा वर्षांपूर्वी त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मंजूर झाला. त्यातून काही प्रमाणात आधार झाला खरा; परंतु गेल्या तीन वर्षांपासून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ बंद झाल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा, याची विवंचना तिमप्पा यांना लागली. थरथरत्या हातांना काही तरी काम मिळावे म्हणून काही चादर कारखानदारांकडे खेटे घातले तर वृध्दापकाळामुळे कोणीही कामावर घेईना. काही ठिकाणी  सहानुभूतीपोटी मूठभर भीक मिळाली. दिवसभर फिरून काही तरी मिळवायचं आणि पोटाची भूक भागवायची, काही नाहीच मिळालं तर उपाशीपोटी घोटभर पाणी पिऊन झोपायचं, असा जीवनातील जगण्याचा संघर्ष सुरू झाला. इकडे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ खंडित न होता तो पूर्ववत मिळावा म्हणून प्रशासन यंत्रणा, बँक आदी ठिकाणी वारंवार खेटे घालताना पायातील चप्पल झिजून गेली, परंतु पदरी निराशाच आली. शेजार-पाजारची गोरगरीब, श्रमिक मंडळी तरी दररोज कुठवर मदत करणार?  जगण्याच्या या लढाईत हार येऊ लागल्याने चक्क त्यांनी कोळसा खाणे सुरू केले. हे दाम्पत्य असे कोळसा खात असल्याचे धक्कादायक चित्र पाहण्यास मिळाल्यावर समाजातील संवेदनशील मने जागी झाली. कुणी धान्य, कुणी अन्न पुरवण्यास सुरुवात केली. सरकारी पातळीवरही त्यांचे रखडलेले संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान देण्यासाठी हालचाल सुरू झाली. तूर्तास तरी या दाम्पत्यावरची ही कोळसा खाऊन जगण्याची वेळ टळली आहे.

सुभाष देशमुख यांची मदत

माचर्ला दाम्पत्याची ही व्यथा समजताच काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी यशदा युवती फौंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या घरी तातडीने धान्य पाठविले. काही जणांनी चप्पल, चष्मा व जीवनावश्यक वस्तू आणून दिल्या. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार लोकमंगल अन्नपूर्णा योजनेतून या दाम्पत्याला रोज दोनवेळचे जेवणाचे डबे घरपोच मिळण्याची सोय करण्यात आली आहे.

अनुदानाबाबत हालचाली

तिमप्पा माचर्ला यांना तीन वर्षांपासून मिळत नसलेले संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मिळवून देण्याबाबत मदतीचे आश्वासन तहसीलदार अरूणा गायकवाड यांनी दिले आहे. त्यांनी अनुदानाची ही रक्कम मिळत नसल्याचे कबूल केले. लाभाची रक्कम मिळत असलेल्या सोलापूर जिल्हा बँंकेच्या खात्याचा विस्तारित क्रमांक ‘आयएफसी कोड’सह अद्ययावत होऊ न शकल्याने या दाम्पत्याचे हे अनुदान आजवर रखडले. आपल्या कार्यालयाने ही दुरूस्ती करून बँकेला पाठविल्याने आता त्यांना अनुदानाची रक्कम मिळू शकेल असे त्या म्हणाल्या.