अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपालनगर नजीकच्या ज्योती कॉलनीत राहणाऱ्या वृद्ध महिलेसह त्यांच्या मुलाने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. गरिबीला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत मुलाने पत्नी व दोन मुलांचा सांभाळ करण्याची भावनिक साद नातेवाईकांना घातली आहे. मायलेकाच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

शकुंतला शांतीनाथ पांढरकर (६५) व मनोज शांतीनाथ पांढरकर (४५) दोघेही रा. ज्योती कॉलनी अशी मृत मायलेकांची नावे आहेत. मनोज हे पत्नी, दोन मुले व आई शकुंतला यांच्यासोबत राहत होते. मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांचा एक मुलगा बारावीला तर दुसरा मुलगा इयत्ता नववीत शिकतो. काही दिवसांपूर्वी मनोज यांच्या सासऱ्यांचे निधन झाल्याने त्यांची पत्नी लहान मुलासह माहेरी गेली होती, तर बारावीची परीक्षा असल्याने मोठा मुलगा शहरातीलच रहिवासी मावशीकडे वास्तव्यास होता. त्यामुळे मनोज व त्यांची आई शकुंतला हे दोघेच घरी होते. बुधवारी रात्री या दोघांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आज सकाळी १० वाजल्यानंतरही घराचे दार न उघडल्याने शेजाऱ्यांनी चौकशी केली. त्यांनी दार वाजवून बघितले. मात्र आतून प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांनी याची माहिती परिसरातील नातेवाईकांना दिली. त्यानंतर घराचे दार तोडण्यात आले. यावेळी मनोज व त्यांची आई शकुंतला मृतावस्थेत आढळून आले.  पोलिसांना घरात मनोज यांची मृत्यूपूर्व लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली. मी व आई आत्महत्या करीत आहे. माझी पत्नी व मुलांचा योग्यरित्या सांभाळ करा, अशी भावनिक साद त्यांनी या चिठ्ठीतून नातेवाईकांना घातली आहे. गरिबीला कंटाळून मनोज यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.