|| वसंत मुंडे

आष्टीच्या अविनाश साबळेच्या परिश्रमाची ‘अडथळ्यांची शर्यत’ :- आई-वडील वीटभट्टीवरील मजूर. तो आणि त्याची बहीणही तेथेच राबलेले. पण मनात उच्च शिक्षित व्हावे, ही त्याची ऊर्मी. परिस्थितीमुळे ते साध्य झाले नाही. सैन्य दल खुणावू लागले म्हणून तो सैनिक झाला. तेथे त्याच्या क्रीडाक्षेत्रातील गुणवत्तेला संधी मिळाली. खडतर परिश्रम ही त्याची जमेची बाजू होती. अंगच्या जिद्दीला त्या परिश्रमाची जोड मिळाली आणि त्याला ऑलिम्पिकमध्ये ‘अडथळ्यांची शर्यत’ या क्रीडा प्रकारात देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. असा प्रत्यक्ष जीवनातही अडथळ्यांची शर्यत पार करणारा प्रवास आहे आष्टीतील अविनाश साबळे या तरुणाचा.

अविनाश साबळेला तीन हजार मीटरची शर्यत पार करून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यश मिळवल्यानंतर थेट ऑलम्पिक स्पर्धेचीच द्वारे खुली झाली. या क्रीडा प्रकारात तब्बल ६७ वर्षांनंतर अविनाशच्या माध्यमातून भारताला संधी मिळाली आहे.

अविनाश साबळे हा बीड जिल्ह्य़ातील दुष्काळी भाग म्हणून ओळखले जात असलेल्या आष्टी तालुक्यातील मांडवा गावचा. एक हजार लोकसंख्येचे हे गाव.

अविनाश भारताचे ऑलिम्पिक स्पध्रेतील अडथळ्यांची शर्यत या क्रीडा प्रकारात नेतृत्व करण्यासाठी निवडला आहे. वैशाली व मुकुंद साबळे या दाम्पत्याचा तो मुलगा. या दाम्पत्याला दोन मुले आणि एक मुलगी. खडकाळ चार एकर जमीन असल्याने वीटभट्टीवर मजूर म्हणून ते काम करत कुटुंबाची गुजराण करायचे. गावातील शाळेतच प्राथमिक शिक्षण घेत असताना ही मुलेही वीटभट्टीवरच मजुरी करू लागले. परिणामी इच्छा असतानाही अविनाश याला उच्च शिक्षण घेता आले नाही. कुटुंबाच्या नाजूक परिस्थितीमुळे बारावी होताच अविनाश सन्य दलाच्या भरतीला उभा राहिला. पहिल्यांदा निवड झाली. पण कागदपत्र कमी पडले. तीन तासांचा वेळ दिला, तेव्हा आईच्या गळ्यातील सोने मोडून तीन हजार खर्चासाठी जमा करून कागदपत्रे दिली. पण संधी हुकली. चार महिन्यांनंतर पुन्हा सन्य दलात भरती झाला. जम्मू-कश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना सन्य दलांतर्गत अडथळ्यांची शर्यत (स्टीपलचेस) या क्रीडा प्रकारात अविनाशने सहभाग नोंदवला आणि सर्वाचेच लक्ष वेधले गेले. प्रशिक्षक अमरीशकुमार यांनी अविनाशमधील गुणवत्ता हेरली आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण दिल्यानंतर २५ वर्षे वयाच्या अविनाशने अवघ्या तीन वर्षांच्या प्रशिक्षणात तीन हजार मीटर अडथळ्यांची शर्यतीत यश मिळवले. परिस्थितीने कणखर बनवलेल्या अविनाशने परिश्रम आणि जिद्दीने मागच्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत ८ मिनिट २९.८० सेकंद वेळात तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रम केला. तर दोहा येथे झालेल्या स्पर्धेत पहिल्याच फेरीत ८ मिनिट २५.२३ सेकंदाचा विक्रम केला. तर चौथ्या फेरीत ८ मिनिट २१.३७ सेकंद वेळ नोंदवून ऑलिम्पिक स्पर्धेत प्रवेश निश्चित केला.

ऑलिम्पिक स्पर्धेत अडथळ्यांची शर्यत या क्रीडा प्रकारात पुरुष गटात १९५२ नंतर पहिल्यांदाच भारताला तब्बल ६७ वर्षांने प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. पुढच्या वर्षी जपानमधील टोकियो या शहरात होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी अविनाशची तयारी सुरू असून या स्पर्धेत यश मिळवणे हे त्याचे आता ध्येय बनले आहे. वैयक्तिक जीवनातही परिस्थितीच्या अडथळ्यांवर मात करत ऑलिम्पिक स्पर्धेत अविनाशने मिळवलेला प्रवेश परिस्थितीसमोर हतबल झालेल्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.