ओमान येथे राहणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या बीडमधील वृद्ध दाम्पत्यासह एकाच कुटुंबातील सहा जण बेपत्ता झाले आहेत. मस्कत येथील पर्यटन स्थळाजवळ झालेल्या ढगफुटीत हे सहा जण बेपत्ता झाले आहेत. सरदार खान हा या दुर्घटनेतून बचावले असून त्यांच्या डोळ्यादेखत कारमध्ये बसलेले आईवडिलांसह संपूर्ण कुटुंबच पाण्यात वाहून गेले. तीन दिवसांनंतरही या कुटुंबाचा शोध सुरुच असल्याचे ओमानमधील माध्यमांनी म्हटले आहे.

बीडमधील माजलगाव येथे राहणारे बुखारी विद्यालयातील निवृत्त शिक्षक खैरुला खान सत्तार खान यांचा मुलगा सरदार खान हा ओमानमधील मस्कत येथे नोकरीला आहे. सरदार खान हा फार्मासिस्ट असून मस्कतमध्ये तो पत्नी आर्शी, मुलगी सिद्रा (वय ४), मुलगा झैद (वय २) आणि नवजात बाळासह राहत होता. दोन- तीन वर्षांपासून सरदार खान बीडमधील घरी आला नव्हता. त्यामुळे यंदा खैरुला खान सत्तार खान आणि त्यांची पत्नी शबाना हे दोघे मस्कत येथे मुलाच्या घरी गेले होते.

शनिवारी सरदार खान पत्नी, मुलं आणि आई – वडिलांसह मस्कतजवळील पर्यटन स्थळावर जाण्यासाठी निघाला. ते सर्व जण कारमधून निघाले होते. मात्र, मस्कतमध्ये शनिवारी ढगफुटी झाली. एका पुलावर सरदार खान हे कारमधून खाली उतरले असताना त्यांची कार पाण्यात वाहून गेली. सरदार खान यांनी कसे बसे एका झाडाला पकडून ठेवल्याने ते बचावले आहेत. त्यांच्या डोळ्यादेखत संपूर्ण कुटुंब वाहून गेले आहे. दोन दिवसांनंतरही शोधमोहीम सुरुच आहे.