लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला शहरात करोनामुळे सलग होणाऱ्या मृत्यूंच्या सत्रात तब्बल १२ व्या दिवशी खंड पडला. सुदैवाने बुधवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. १९ नवे रुग्ण वाढल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १०९२ वर पोहचली आहे. आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला.

अकोला जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सातत्याने वाढतच आहे. अद्याापही त्यावर नियंत्रण आले नाही. गेल्या ११ दिवसांत मृत्यूदरही झपाट्याने वाढत गेला. शहरात ६ ते १६ जूनपर्यंत सलग ११ दिवसांत तब्बल २२ जण दगावले आहेत. १२ व्या दिवशी आज मृत्यूच्या या मालिकेला खंड पडला. आज करोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण ९१ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ७२ अहवाल नकारात्मक, तर १९ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०९२ झाली.

सध्या रुग्णालयात ३२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात नऊ जण करोनाबाधित आढळून आले. त्यात चार महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. अशोक नगर, अकोट फैल येथील प्रत्येकी दोन, तर दगडीपूल, आदर्श कॉलनी, जुल्फिकार नगर, बार्शीटाकळी व पातूर येथील प्रत्येकी एक रहिवासी आहे. सायंकाळच्या अहवालानुसार आणखी १० रुग्णांची भर पडली. त्यात महिला व पुरुष प्रत्येकी पाच आहेत. त्यात समतानगर तारफैल येथील पाच जण, खदान तीन, शिवनी व वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. अकोला शहरासह बाळापूर, पातूर व बार्शिटाकळी तालुक्यामध्येही करोना वेगाने हातपाय पसरतो आहे. नवीन भागात करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यावर तो परिसर प्रतिबंधित करून जवळून संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येत आहे. लक्षणे आढळून आल्यास नमुने देखील घेतले जात आहे. प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रात गत २८ दिवसांपासून नवीन रुग्ण आढळून न आल्यास संबंधित परिसर निकषानुसार मुक्त केला जात आहे. अकोला शहरातील १८ परिसर प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आले.

३१ जणांची करोनावर मात
अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ७०७ रुग्णांची करोनावर मात केली आहे. करोनातून ते बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात आज दुपारनंतर रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या ३१ जणांचा समावेश आहे. त्यातील १७ जणांना घरी पाठवण्यात आले तर उर्वरित १४ जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.

साडेसहा हजारावर अहवाल नकारात्मक
अकोला जिल्ह्यातील आतापर्यंत साडेसहा हजारावर अहवाल नकारात्मक आले आहेत. आजपर्यंत एकूण ७६४१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७३२२, फेरतपासणीचे १३३ तर वैद्याकीय कर्मचाºयांचे १८६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७६३१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ६५३९ आहे, तर सकारात्मक अहवाल १०९२ आहेत.