भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगावला भेट देण्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. कोणी आम्हाला रोखू शकत नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मागच्यावर्षी १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथे दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षातून मोठा हिंसाचार झाला होता.

त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. एकूणच भीमा-कोरेगावची संवेदनशीलता लक्षात घेऊन कोणालाही भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ सभा घेण्याची परवानगी देणार नाही असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

आज अहमदनगर दौऱ्यावर आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव येथे जाण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही असे सांगितले. मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणामुळे ओबीसी समाजात अस्वस्थतता आहे. त्या अस्वस्थततेचे निवडणूक काळात पडसाद उमटू शकतात अशी भिती त्यांनी व्यक्त केली. सध्या देशात भाजपा विरोधी वातावरण असून भाजपाला दोनशेपेक्षा कमी जागा मिळतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.