राज्यात सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा विषय गाजत आहे. महाविकास आघाडी सरकारमधल्या एका मंत्र्याचे नाव या विषयाशी जोडले जात आहे. या बद्दल संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, “हा जो विषय आहे, तो फक्त राजकीय नाही. हा राजकीय, भावनिक विषय आहे, तसेच पोलिस तपास करीत आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करून तपासात दिशाभूल करणे किंवा अडथळे आणणे, असं आम्ही करणार नाही” असे संजय राऊत यांनी सांगितले.

“राज्यातील सरकार कोणालाही पाठीशी घालत नाहीय आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेवर आपण सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे” असे ते म्हणाले.  विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

चंद्रकांत दादा विसरले का?

“करोनाचं कारण पुढे करून संसद होऊ दिली नाही. हे चंद्रकांत दादा विसरले का? हे देशावर नव्हे तर जगावर आलेल संकट आहे. ते निमित्त वैगरे नाही. ते संकटच आहे. पाच वर्ष सत्तेत राहिलेल्या चंद्रकांत दादा सारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे भाष्य करावे. हे दुर्देव आहे आणि कशा करिता आम्ही घाबरत आहोत. आज ही १७० च बहुमत आमच्याकडे आहे. आम्ही सरकार स्थापन करताना देखील सांगितले होते. आम्हाला बहुमताची अजिबात चिंता नाही. आम्हाला चिंता आहे ती म्हणजे या संसर्गाची” असे राऊत म्हणाले.

इंधन दरवाढीविरोधात भाजपा रस्त्यावर उतरला तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ
राज्यातील विरोधी पक्षात असलेल्यांना माझ एक आव्हान आहे की, पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे. हेच नरेंद्र मोदी आंदोलनाची थट्टा करीत असतील, तरी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टीने देशभरात आणि राज्यात लोकांच्या कल्याणाची भावना लक्षात घेऊन, इंधन दरवाढी विरोधात रस्त्यावर उतरावे, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.